मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाकडून दहावी आणि बारावी परीक्षेचं संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. 29 एप्रिल ते 20 मे 2021 दरम्यान दहावी बोर्डाची परीक्षा होण्याची शक्यता आहे. तर 23 एप्रिल ते 21 मे 2021 दरम्यान बारावीची परीक्षा होणार असल्याचं या संभाव्य वेळापत्रकात बोर्डाने जाहीर केलं आहे. बोर्डाने या संदर्भात परिपत्रक जारी केलं आहे.
कोरोनाव्हायरसच्या पार्श्वभूमीवर शिक्षम मंडळाच्या ठरलेल्या कालावधी परीक्षा घेता आली नाही. त्यामुळे सरकारच्या परवानगीनंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडाळाने एप्रिल आणि मे महिन्यात दहावी आणि बारावीची लेखी परीक्षा आयोजित केली आहे.
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (बारावी) - शुक्रवार 23 एप्रिल 2021 ते शुक्रवार 21 मे 2021
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (दहावी) - गुरुवार 29 एप्रिल 2021 ते बुधवार 20 मे 2021
बोर्डाच्या पत्रकानुसार, शाळा, कनिष्ठ महाविद्यालये आणि विद्यार्थ्यांना अभ्यासाचं नियोजन करता यावं, तसंच विद्यार्थ्यांचा ताण कमी व्हावा यासाठी मंडळाने एप्रिल-मे 2021 च्या लेखी परीक्षेचं संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. www.mahahsscboard.in या अधिकृत वेबसाईटवर आजपासून हे वेळापत्रक उपलब्ध करुन देण्यात आलं आहे.
दरम्यान मंडळाच्या वेबसाईटवरील संभाव्य वेळापत्रकाची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा/उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडे छापील स्वरुपात दिलं जाणारं वेळापत्रक अंतिम असेल. इतर वेबसाईटवरील किंवा इतर यंत्रणेने छापलेले तसंच व्हॉट्सअॅप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेलं वेळापत्रका ग्राह्य धरु नये, असंही बोर्डाने स्पष्ट केलं आहे.