मुंबई: लोकसभेच्या निवडणुका जसजशा जवळ येतील तसतसे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आल्याचं दिसतंय. मुंबईचे भाजप प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी सोमवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली आणि मंगळवारी मनसेचे नेते भाजपच्या कार्यक्रमात दिसले. मनसे नेते बाळा नांदगावकर आणि शिशिर शिंदे हे 'धन्यवाद देवेंद्रजी' या भाजपच्या कार्यक्रमात उपस्थित राहिल्याने सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत.
वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या म्हाडा, एसआरएतील गृहनिर्माण सोसायट्यांच्या समस्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे सुटल्या. त्यामुळे मुंबई भाजपकडून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 'धन्यवाद देवेंद्रजी' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमाला मनसेच्या नेत्यांनी उपस्थिती लावली.
कोण कुणाला कधी टाळी देतोय समजत नाही
या कार्यक्रमात बोलताना मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले की, सगळ्यांना आश्चर्य वाटलं असेल मी आणि सरदेसाई का आलो? मला प्रवीण दरेकरांनी फोन केला होता. कोण कोणाला काय बोलतो ते कळत नाही, कोण कोणाला कधी टाळी देतं हे देखील कळत नाही. विकास करा म्हटल्यावर मला धडकी भरली. सीडी, ईडी बोलल्यावर धडकी भरते हो. चांगलं काम करणारं सरकार राज्यात असणं आवश्यक आहे आणि आपण उत्तम काम करताय. पुन्हा पुन्हा येणार असं तुम्हीच बोलता ना? तीच संधी पुन्हा मुंबई तुम्हाला देईल.
मनसे-भाजप युतीच्या चर्चांना उधाण
भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी दोन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली होती. या दोन्ही नेत्यांमध्ये भाजप आणि मनसे यांच्यातील युतीसंदर्भात चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. मनसेला महायुतीत सामील करण्यासाठी दिल्लीतील नेतृत्वाकडूनही विचारमंथन सुरु असल्याची मोठी माहिती सुत्रांकडून समोर आली आहे.
आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांच्यासोबतच्या भेटीवर प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की, साथ वगैरेचा काही सवाल नाही आम्ही राजकीय मित्र आहोत भेटत असतो. युतीबाबत चर्चा झाली का, या प्रश्नावर उत्तर देताना शेलार यांनी सांगितलं की, 'मन की चर्चा झाली, जन की बात' झाली. शेलार पुढे म्हणाले की, राजकरणात भेटीगाठी होत असतात, चर्चा होत असतात. अद्याप कोणताही राजकीय निर्णय नाही, योग्य वेळी याबाबत चित्र स्पष्ट होईल, असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. 'देवेंद्रजी म्हणाले आहेत तर, लवकरच चित्र स्पष्ट होईल. सध्या मी मनसेबद्दल काहीच बोलणार नाही, योग्य वेळी यावर निर्णय होईल', असं शेलार यांनी सांगितलं आहे.
ही बातमी वाचा :