मुंबई : दिल्ली निवडणूकांचे बिगुल वाजले असून दिल्ली काबीज करण्यासाठी पक्षांमध्ये चढाओढ दिसून येत आहे. निवडणुकीतील सर्वेक्षण पाहता आम आदमी पक्षाचे पारडे सध्यातरी जड वाटत आहे. यासाठी भाजपने रणनीती आखली असून दिल्लीच्या निवडणुकीसाठी त्यांना महाराष्ट्रातून रसद पुरवली जाणार आहे. आजपासून महाराष्ट्रातील भाजप नेते दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचारात सहभागी होणार आहेत. राज्यातून एकूण 25 जणांवर दिल्ली निवडणुकीची जबाबदारी दिली जाणार असून देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे आजपासूनच दिल्लीला प्रचारासाठी रवाना होणार आहेत. तर चंद्रकांत पाटील आणि आशिष शेलार फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात दिल्लीत प्रचारासाठी जाणार आहेत.


निवडणूक आयोगाने दिल्ली विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर केली आहे. विधानसभेसाठी दिल्लीमध्ये 8 फेब्रुवारीला मतदान होणार असून 11 फेब्रुवारीला निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात येतील. या निवडणुकीच्या निकालासंदर्भात एबीपी न्यूजने घेतलेल्या ओपिनियन पोलमध्ये मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल यांनाच पसंती मिळाली आहे. त्यामुळे भाजपने केजरीवाल यांना रोखण्यासाठी रणनीती आखल्याचे दिसत आहे. याचाच भाग म्हणून आता महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांवर दिल्लीतील प्रचाराची जबाबदारी देण्यात आली आहे.

नाराज पंकजा मुंडे, खडसेंनाही दिल्लीत जबाबदारी -
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे हे दोघे आजपासूनच दिल्लीत प्रचाराला सुरुवात करणार आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि आशिष शेलार फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात दिल्लीत प्रचारासाठी जाणार आहेत. नाराजी नाट्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनाही दिल्लीत निवडणुकीची जबाबदारी दिली आहे. तर, प्रवीण दरेकर, संजय कुटे, सुरजित सिंघ ठाकूर यांचाही निवडणूक प्रचारात समावेश करण्यात आला आहे. राज्यातील प्रत्येक नेत्याकडे एकूण 10 विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी वाटून देण्यात आली आहे.

2015 विधानसभा निवडणुकांचे निकाल -
2015मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला बहुमत मिळालं होतं. आम आदमी पार्टीने 67 जागांवर विजय मिळवला होता. तीन जागा भाजपच्या खात्यात गेल्या होत्या. काँग्रेसला मात्र एकाही जागेवर विजय मिळवता आला नव्हता. दिल्लीत विधानसभेच्या एकूण 70 जागा आहेत.

Special Report | दिल्ली विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीची एन्ट्री, सात उमेदवार रिंगणात