Maharashtra Assembly Monsoon Session : राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज असताना शिंदे- फडणवीस सरकार मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेली मदत तुटपुंजी असून 25 हजार कोटी रुपयांच्या पुरवण्या मागण्या सादर करण्यास आल्या पण त्यात शेतकऱ्यांसाठी दमडीची तरदूत केली नसल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले. या सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले असल्याचा आरोप त्यांनी केला.
विधीमंडळ परिसरात माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, अतिवृष्टीने गावे उद्धवस्त झाली आहेत. शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले असून जनावरे वाहून गेली आहेत. सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याची गरज आहे. पण राज्य सरकारला शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे वाटत नाहीत. विरोधी पक्ष म्हणून आम्ही सातत्याने शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत आहोत पण सरकार शेतकरी प्रश्नावर बोलण्यास तयार नसल्याचा आरोप त्यांनी केला.
पुरवणी मागण्यांमध्ये शेतकऱ्यांसाठी एक रुपयाचीही तरतूद नाही. उस्मानाबाद जिल्ह्यातील एका शेतकऱ्यांने आज मंत्रालयाजवळ पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. तर वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्याने सोमवारी आत्महत्या करून आयुष्य संपवले. शेतकऱ्याला मंत्रालयलाच्या सहाव्या मजल्यावर मारहाण करण्यात आली, शेतकरी दररोज आत्महत्या करीत आहे पण राज्यातील सरकार आपल्याच मस्तीत वागत असल्याची घणाघाती टीका पटोले यांनी केली.
प्रति हेक्टर दीड लाखांची नुकसानभरपाई द्या
शेतकऱ्यांना हे सरकार आपले वाटत नाही ही भावना वाढत चालली आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी 75 हजार रुपये कोरडवाहूसाठी तर बागायती तसेच फळबागासाठी हेक्टरी दीड लाख रुपये दिले पाहिजेत, या मागणीवर आम्ही ठाम आहोत असेही त्यांनी म्हटले.
रायगडच्या समुद्रात शस्त्रात असलेली एक बेवारस बोट सापडली तर ट्रॅफिक हवालदाराच्या व्हॉट्सऍपवर मुंबईवर हल्ला करणारा मेसेज येतो हे गंभीर आहे. मुंबई शहर हे संवेदनशील शहर आहे, पण हे प्रकार समोर आल्याने मुंबईच्या सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत, राज्य सरकारने या प्रमुख विषयांवर लक्ष देण्याची गरज आहे असेही पटोले म्हणाले.