Com. Govind Pansare Case: ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉम्रेड गोविंद पानसरे (Comrade Govind Pansare Murder Case) यांच्या हत्येचा तपास आता महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाकडून (Maharashtra ATS) करण्यात येणार आहे. कॉ. पानसरे हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे (CID) विशेष चौकशी पथकाने (SIT) या प्रकरणातील महत्त्वाची कागदपत्रे दहशतवादविरोधी पथकाकडे सोपवली आहेत.
कोल्हापूरमध्ये कॉम्रेड गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नीवर मॉर्निंग वॉक दरम्यान 16 फेब्रुवारी 2015 रोजी गोळ्या झाडण्यात आलेल्या. उपचार सुरू असताना काही दिवसांनी कॉम्रेड पानसरे यांचे निधन झाले. कॉ. पानसरे हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीच्या विशेष पथकाकडून सुरू होता. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष तपास पथकाला हत्येला सात वर्षे उलटूनही कोणतीही मोठी प्रगती करता आली नाही. त्यानंतर हा तपास एटीएसकडे सोपवण्यासाठी पानसरे कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने तपास एटीएसकडे सोपवण्याचे आदेश दिले. न्यायाधीश रेवती मोहिते डेरे आणि न्यायाधीश शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाने हा तपास वर्ग करण्याचे आदेश दिले होते. दहशतवादविरोधी पथकाला एसआयटीतील काही अधिकारी तपासात सहकार्य करणार आहेत.
एटीएसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची कागदपत्रे सीआयडीकडून मिळाली आहेत. या हत्येचा तपास एटीएसच्या पुणे शाखेकडून करण्यात येणार आहे. या प्रकरणातील शूटरला अटक करण्यावर लक्ष केंद्रीत येणार असल्याचे एटीएसने सांगितले. कॉम्रेड पानसरे हत्या प्रकरणी आतापर्यंत 10 जणांना अटक करण्यात आली आहे. तर, दोन मुख्य आरोपी अद्याप फरार आहेत.
उच्च न्यायालय तपासावर नाराज
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी इतकी वर्षे लोटली तरी अद्यापही तपासात प्रगती का झाली नाही?, असा सवाल उपस्थित मुंबई उच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली. राज्य सरकारला मागील दोन वर्षात या प्रकरणी केलेल्या तपासाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश हायकोर्टाने 7 जुलै 2022 मध्ये झालेल्या सुनावणीत दिले होते.
प्रकरणाचा तपास एटीएसकडे सोपवा
अंनिसचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, जेष्ठ विचारवंत एम. एम. कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्यांमागील सूत्रधार एकच असून त्यांचा शोध घेण्यास सीबीआय आणि एसआयटी अपयशी ठरल्या आहेत. शेजारील राज्यात झालेल्या कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या मारेक-यांना अटक होऊन खटले आता अंतिम टप्यात आहेत. मात्र इथं परिस्थिती जैसे थेच आणि तपास अतिशय संथ गतीनं सुरूय. त्यामुळे या हत्येमागचे खरे सुत्रधार शोधण्यासाठी या प्रकरणांचा तपास राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाकडे (एसटीएस) सोपवावा, अशी मागणी दाभोलकर- पानसरे कुटुंबियांनी हायकोर्टाकडे केली होती.