जान्हवी मोरेचा रविवारी डोंबिवलीच्या पलावा जंक्शनजवळ टँकरखाली चिरडून मृत्यू झाला. तिच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या टँकरचालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला अटक केली आहे. परंतु या मृत्यूला या भागातला वाहतूक व्यवस्थेचा उडालेला बोजवाराच कारणीभूत असल्याचे समोर आले आहे.
ज्या पलावा जंक्शनला जान्हवीचा अपघात झाला, तिथे वाहतुकीचे कोणतेही नियम पाळले जात नसून सर्वसामान्य वाहनचालक, पादचारी अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करत असल्याची बाब समोर आली आहे.
जान्हवीचा अपघात हा रस्ता ओलांडताना झाल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. ज्या ठिकाणी हा अपघात झाला, त्याठिकाणी रस्त्यावरील दुभाजक काढण्यात आले आहेत. त्यामुळे तिथे सिग्नल किंवा वाहतूक पोलीस असणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
याबाबत एबीपी माझाने वाहतूक पोलिसांना विचारले असता त्यांनी सांगितले की, इथे कायम वाहतूक पोलीस तैनात असतात. जान्हवीच्या अपघाताला वाहतूक पोलीस जबाबदार नाहीत. परंतु स्थानिकांशी चर्चा केल्यानंतर स्थानिकांनी सांगितले की, वाहतूक पोलीस अनेकदा जंक्शनजवळ नसतात, अशा वेळी अपघात होतात.
या घटनेवरुन मनसेने सरकार आणि सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. पलावा सर्कलवर अनेक वर्षांपासून वाहतुकीची समस्या असून त्यामुळेच इथे उड्डाणपूल उभारण्यात येणार होता. त्याचे भूमिपूजनही झाले, परंतु पुढे काहीच झाले नाही, असा आरोप मनसेचे नेते राजू पाटील यांनी केला आहे. तसेच जान्हवी मोरे हा सरकारी अनास्थेचा बळी असल्याचे मतही पाटील यांनी व्यक्त केले आहे.