मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 64 वा महापरिनिर्वाण दिन आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने दरवर्षी दादर येथील चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी दरवर्षी अनुयायांचा सागर उसळतो. पण यंदा कोरोनाचा संसर्ग परसू नये यासाठी चैत्यभूमीवर येऊ नये, असे आवाहन राज्य सरकारसह मुंबई पालिकेने केले आहे.


आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महापौर किशोरी पेडणेकर, धनंजय मुंडे, आदित्य ठाकरे, वर्षा गायकवाड  यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं.  तर आरपीआयचे नेते रामदास आठवले हे देखील चैत्यभूमीवर येत अभिवादन करणार आहेत. त्याशिवाय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सकाळी 11 वाजता अभिवादन करतील.


महानगरपालिका प्रशासन आणि पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या आवाहनाला विविध आंबेडकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी एकमताने संमती दर्शविली आहे. दरवर्षी राज्यशासन, बृहन्मुंबई महानगरपालिका तसेच मुंबई पोलिस आणि इतर शासकीय विभाग देखील महापरिनिर्वाण दिनी मोठ्या प्रमाणावर अनुयायांना सेवा-सुविधा देतात. यंदाची स्थिती वेगळी असून त्यात सर्वांचे सहकार्य गरजेचे आहे. चैत्यभूमी ही आपली सर्वांची जबाबदारी असून निर्बंध हे कोरोना रोखण्यासाठी आहेत. सर्व अनुयायी आपापल्या घरुन अभिवादन करतील, अशी ग्वाही या संघटनांनी दिली आहे.


दरम्यान चैत्यभूमी परिसरात गर्दी होऊ नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त पाहायला मिळत आहे. दादरमध्ये ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे. महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवरील मानवंदना, अभिवादन आणि दर्शनाचे थेट प्रक्षेपण, विविध माध्यमातून ऑनलाईन दर्शन, स्मारकावर हेलिकॉप्टरद्वारे पृष्पवृष्टी यांसह विविध सुविधा यांचे नियोजन करण्यात आली आहे.



चैत्यभूमी च्या कार्यक्रमाचे लाइव्ह प्रक्षेपण


चैत्यभूमीवरील थेट प्रक्षेपण महापालिकेच्या समाजमाध्यम खात्यांवरून आणि दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून करण्यात येणार आहे. राज्यातील आणि देशातील प्रत्येक आंबेडकरी अनुयायांना आपल्या घरीच हा चैत्यभूमी येथील कार्यक्रम पाहता येईल अशी सोय करण्यात आली आहे.


दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवरून सकाळी 7.45 ते 9 या कालावधीमध्ये शासकीय मानवंदना व हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. त्यानंतर, सकाळी 9.50, 10.50, 11.50 तसेच दुपारी 12.50 वाजता दर 10 मिनिटांसाठी थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. महापरिनिर्वाणदिनी सोशल मीडियावरून ऑनलाइन थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी पुढीलप्रमाणे लिंक उपलब्ध आहेत.


यूट्युब : bit.ly/abhivadan2020yt  येथे क्लिक करावे लागेल.


फेसबुक: bit.ly/abhivadan2020fb


ट्विटर: bit.ly/abhivadan2020tt