मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सिनेमागृह, नाट्यगृह बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर गेल्या महिन्यात राज्य सरकारने सिनेमागृग, नाट्यगृह खुली करण्यास परवानगी दिली. मात्र आज तब्बल आठ महिन्यानंतर खऱ्या अर्थाने रंगभूमी आज अनलॉक झाली आहे. मुलुंड येथील कालिदास नाट्यगृहात आज तिसरी घंटा ऐकू आली आणि पडदा देखील पडला.


नाट्यरसिक ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण आज खऱ्या अर्थाने पुन्हा नाट्यरसिकांना मुलुंडच्या कालिदास नाट्यगृहात अनुभवता आला. 'माझी आमरी' या प्रायोगिक नाटकाचा प्रयोग पार पडला. राज्यात अनलॉक सुरू झाल्यापासून सर्व दक्षतेचे उपाय करून नाट्यगृह सुरू करण्यास ही परवानगी देण्यात आली आहे. त्यानंतर खरंतर सर्व नाट्यगृह सज्ज झाली आहेत. अशात माझी आमरी नाटकाने याचा श्रीगणेशा झाला आहे. तब्बल आठ महिन्यानंतर रंगभूमीचा पडदा उघडला आणि तिसरी घंटा झाली. यामुळे नाटकाचे दिगदर्शक, कलाकार, निर्माते आणि टीमने आनंद व्यक्त केला आहे.


चित्रकार अमृता शेरगिल यांच्या पत्रांवरून तयार करण्यात आलेल्या माझी आमरी या प्रायोगिक नाटकाला देखील चांगली प्रेक्षक संख्या लाभली होती. कोरोना काळात देखील प्रेक्षकांनी या क्षणाचा आनंद घेतला. तसेच पुन्हा एकदा नाट्यगृह सुरू झाली, नाटक सुरू झाले याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. नाट्यगृहातही तिसरी घंटा वाजू लागली असून पडदाही उघडला गेला आहे. काही दिवसातच प्रायोगिक बरोबर व्यावसायिक नाटके देखील आता सुरू होत आहेत. त्यामुळे पुन्हा नाट्यरसिकांना नवनव्या नाट्यकला अनुभवता येणार आहेत.