Mahadev Online Gaming App Case: महादेव अॅप प्रकरणासंदर्भात (Mahadev Online Gaming App) एक मोठी अपडेट समोर आली आहे. महादेव बुक ॲप प्रकरणातील मुख्य आरोपी सौरभ चंद्राकर (Saurabh Chandrakar) हा मुंबईजवळ (Mumbai News) पंचतारांकित हॉटेल्स (Five Star Hotels) आणि रिसॉर्ट्स बांधण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच, सट्टेबाजीत कमावलेल्या पैशांनी सौरभ चंद्राकर यांनी मध्यप्रदेशात (Madhya Pradesh) कोट्यवधींची मालमत्ता खरेदी केली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, या प्रकरणी अनेक बॉलिवूडकरही रडारवर असून या प्रकरणासंदर्भात नवनवी माहिती दररोज समोर येत आहे.  


ईडीच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी भोपाळमध्ये कोट्यवधींची मालमत्ता खरेदी करण्यासाठी या पैशाचा वापर केला आहे आणि त्यासोबत ते मुंबईजवळ एक आलिशान हॉटेल बनवण्याच्या तयारीत होते. महादेव बुक अॅपचे आरोपी मुंबईजवळ पंचतारांकित हॉटेल बांधणार होते, ज्या रिसॉर्टपासून सर्व सुविधा असतील, असा दावा सूत्रांनी केला आहे.


महादेव बुक अॅप प्रकरणाच्या तपासादरम्यान, ईडीला दररोज नवी माहिती मिळत आहे. या संदर्भात ईडीनं अनेक बॉलिवूड कलाकारांना समन्स बजावलं आणि त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यासही सांगितलं. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाच्या तपासादरम्यान, आरोपींनी महादेव बुक अॅप आणि त्याच्याशी संबंधित इतर अॅप्लिकेशन्सद्वारे कमावलेल्या कोट्यवधी रुपयांचा वापर करून अमाप मालमत्ता खरेदी केल्याचं उघड झालं आहे.


ईडी आता महादेव अॅप प्रकरणी चंद्राकरच्या मालमत्तेसह त्यांची कागदपत्र आणि त्यांच्या खरेदी, विक्रीशी संबंधित माहिती गोळा करत आहे. कोट्यवधी रुपयांच्या गुन्ह्यातील पैसे कुठे गुंतवले गेले आणि कोणाकडे गेले, यासंदर्भात माहिती मिळू शकेल. याव्यतिरिक्त या माहितीच्या आधारे ईडी आता त्या सर्व मालमत्ता आणि मुंबईजवळ बांधण्यात येणाऱ्या पंचतारांकित हॉटेलशी संबंधित कागदपत्रं गोळा करण्याचा प्रयत्न करत असल्याचं ईडीच्या सुत्रांनी सांगितलं आहे.


मनी लॉन्ड्रिंगचं मोठं नेटवर्क उघड


महादेव बेटिंग अॅप प्रकरणी ईडी सातत्यानं छापेमारी करत आहे. तसेच, याप्रकरणी अनेकांची चौकशीही करण्यात आली आहे. आता याप्रकरणी बॉलिवूड रडारवर आलं आहे. बॉलिवूड सुपरस्टार रणबीर कपूर सारख्या अनेक मोठ्या नावांचा या प्रकरणात समावेश असल्याची माहिती मिळत आहे. या वर्षी फेब्रुवारी 2023 मध्ये, संयुक्त अरब अमिरातीमध्ये एक शाही विवाहसोहळा पार पडला. या लग्नात 200 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. हे लग्न सौरभ चंद्राकरचं होतं. सौरभ हा छत्तीसगडमधील भिलाई येथील रहिवासी आहे. सौरभनं त्याचा मित्र रवी उप्पलसोबत 'महादेव ऑनलाईन अॅप' सुरू केलं होतं. या अॅपवर ऑनलाईन बेटिंग केली जाते. त्याच्याशाही विवाह सोहळ्यात परफॉर्म करण्यासाठी मोठमोठे सेलिब्रिटी आले होते. या लग्नाच्या शाही थाटामुळे आणि खर्चामुळे हे लग्न ईडीच्या निशाण्यावर आलं आणि त्यानंतर मनी लॉन्ड्रिंगचं सर्वात मोठं नेटवर्क उघड झाले.