मुंबई: महादेव बेटिंग ॲपशी संबधित तब्बल एक हजार कोटी रुपयांचा निधी भारतीय शेअर मार्केटमध्ये गुंतवल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. याप्रकरणात सध्या सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीकडून (enforcement directorate) चौकशी सुरु आहे. या चौकशीदरम्यान आरोपीने सुरेश चौकानी याने एक धक्कादायक कबुली दिली. चौकानी याने बनावट कंपन्यांच्या माध्यमातून भांडवली बाजारात (Share Market) मोठ्याप्रमाणावर पैसे गुंतवले आहेत. यासाठी स्टॉक एक्स्चेंजचे ॲप वापरण्यात आले होते, अशी माहिती सुरेश चौकानी याने ईडीला दिली.


ईडीच्या चौकशीदरम्यान सुरेश चौकानी याने हरी शंकर टिबरेवाल या आणखी एका व्यक्तीचे नाव समोर आणले आहे. महादेव बेटिंग अॅपशी (mahadev betting app) संबधित 1 हजार कोटींच्या आसपासची रक्कम भारतातच बनावट कंपन्या आणि बनावट डी-मॅट खाती तयार करुन शेअर मार्केटमध्ये  गुंतवण्यात आली, असा संशय ईडीला आहे. यासंबंधीची काही कागदपत्रेही ईडीच्या हाती लागली आहेत. आता या कंपन्या कधी स्थापन झाल्या, त्यांची पार्श्वभूमी काय, याची कागदपत्रांच्याआधारे छाननी सुरु आहे. 


अभिनेता साहिल खानचा तुरुंगातील मुक्काम वाढला


काही दिवसांपूर्वी महादेव बेटिंग ॲप प्रकरणात मुंबई पोलिसांनी अभिनेता साहिल खान (Actor Sahil Khan) याला छत्तीसगढमधून अटक केली होती. बुधवारी साहिल खानला न्यायालयात सादर करण्यात आले. त्यावेळी त्याला आणखी एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्यामुळे साहिल खानचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. साहिल खान हा महादेव बेटिंग अॅप प्रकरणातील मुख्य आरोपीच्या संपर्कात असल्याचे मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात समोर आले आहे. पोलिसांकडून साहिल खानने केलेले सर्व बँक व्यवहारांचा लेखाजोखा तपासण्यात येत आहे.


साहिल खान याला मुंबई पोलिसांनी नाट्यमयरित्या अटक केली होती. महादेव बेटिंग ॲप प्रकरणात आरोप झाल्यानंतर साहिल खानने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, उच्च न्यायालयाने साहिल खानची अटकपूर्व जामिनाची याचिका फेटाळली होती. यानंतर साहिल खान अटकेच्या भीतीने मुंबईतून पळून गेला होता. यानंतर त्याने मुंबईतून गोवा, गोव्यातून कर्नाटक, मग हैद्राबाद आणि शेवटी छत्तीसगढ असा प्रवास केला होता. यादरम्यान त्याच्या मागावर असलेल्या मुंबई पोलिसांच्या पथकाने साहिल खानला जगदलबपूर  येथून ताब्यात घेतले होते. 


आणखी वाचा


महादेव बेटिंग ॲप प्रकरणी मोठा खुलासा, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना 508 कोटी दिल्याचा ईडीचा दावा