मराठा आरक्षणाचा निर्णय तातडीने घ्या, पण.. : शरद पवार
विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई | 27 Sep 2016 03:24 PM (IST)
मुंबई: केंद्र आणि राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय तातडीने घ्यावा. पण हा निर्णय घेताना इतर कोणत्याही घटकाला धक्का लावू नये, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. रायगड जिल्ह्यातील उरण येथे पत्रकारांशी बोलताना, पवारांनी ही प्रतिक्रिया दिली. मराठा समाजाचे मोर्चे कोणत्याही समाजाविरोधात नाहीत. मोठ्या प्रमाणात तरुण रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे आरक्षणाचा निर्णय तातडीनं घ्यावा असं पवार म्हणाले. याशिवाय पठाणकोट आणि उरी हल्ल्याबद्दलचा निर्णय लष्कर प्रमुखांचा सल्ला घेऊन घ्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना पाकिस्तानला लव लेटर पाठवणं बंद करा अशी भाषा करत होते. आता मात्र त्यांच्यात बदल झालेला दिसतोय, असं म्हणत शरद पवारांनी टोला लगावला.