मुंबई : मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या मध्य वैतरणा जलाशयाचं नाव 'हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय' असं करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या नामफलकाचं उद्घाटन करण्यात आलं.


 
या कार्यक्रमाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मंत्री एकनाथ शिंदे, विष्णू सावरा, रवींद्र वायकर, मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर, खासदार राहुल शेवाळे उपस्थित होते.

 

चांगल्या कामाची चर्चा नाही : उद्धव

 

'मुंबई महापालिकेच्या वाटेला कौतुकाचे बोल फार कमी येतात. जरा कुठे खट्ट झालं की टीका होते पण महापालिकेने मोठं काम केलं की त्याची चर्चा होत नाही' अशी खंत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली. यावेळी मुंबईकरांना नळातून पाणीपुरवठा झाला, रस्त्यावर पावसाचे पाणी साचून नाही, असं म्हणत दक्षता घेतल्याबद्दल उद्धव यांनी पालिका आयुक्तांचे आभारही व्यक्त केले.

 
'मुंबईच्या नालेसफाईची चौकशी जरुर करा पण काल दिल्ली पाण्यात बुडाली त्याची चौकशी कोण करणार? असा सवालही मुख्यमंत्र्यांचा उपस्थितीत उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. 'शिवसेनाप्रमुख म्हणजे ऊर्जा, तसेच मुंबई महापालिकेच्या माध्यमातून या जलाशयात एक वीजनिर्मिती केंद्र प्रस्तावित आहे. मुख्यमंत्र्यांनी लवकर या प्रकल्पाला परवानगी द्यावी', अशी मागणीही उद्धव ठाकरेंनी केली.

 

'बाळासाहेब ठाकरे हे आमच्यासाठी ऊर्जेचा स्रोत आणि प्रेरणास्थान होते. मित्रपक्षांसोबतच विरोधकांना मदत करण्याची बाळासाहेबांची परंपरा होती. अडचणीत असलेल्या विरोधकांना बाळासाहेबांनी कधी खिंडीत गाठलं नाही तर मदत करून राजकारणाची उंची राखली.' अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बाळासाहेबांवर स्तुतिसुमनं उधळली.

 
'मध्य वैतरणा जलाशयात ऊर्जानिर्मिती सुरु करुन मुंबई महापालिका पूर्णपणे त्याचं संचालन करेल असा निर्णय राज्य सरकारने घेतले आहे. लवकरच यासंदर्भात महापालिकेशी संवाद साधला जाईल.' अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.