मुंबई : मुंबईमधील लोअर परेलचा रेल्वे पूल आज सकाळपासून वाहतुकीसाठी आणि पदचाऱ्यांसाठी बंद केल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय आहे. त्यातच आता लोअर परेलच्या रेल्वे पुलाच्या बांधकामावरुन मुंबई महापालिका आणि रेल्वे प्रशासन आमनेसामने आलं आहे.

लोअर परेलच्या पुलाचं बांधकाम महापालिकेने करावं असं पत्र रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलं आहे. हँकॉक पूल आणि चर्नी रोड स्टेशनच्या रेल्वे पुलाचे काम महापालिकेने केले होते, त्याप्रमाणे लोअर परेल रेल्वे पुलाचं बांधकामही कराव, असं रेल्वे प्रशासनाचे म्हण‌णं आहे.

तर पुलाची संपूर्ण जबाबदारी ही रेल्वेचीच असून, बांधकामासाठी आवश्यक ती मदत करण्यास तयार असल्याचं महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, बंद केलेल्या पुलावरुन किमान पादचाऱ्यांना जाण्या-येण्यास परवानगी द्यावी अशी सूचना मुंबई महापालिकेकडून करण्यात आली आहे. यासाठी रेल्वे प्रशासन आणि महापालिका प्रशासनात बैठक पार पडणार आहे.

प्रवाशांचा गोंधळ
दक्षिण मुंबईतील 'कॉर्पोरेट हब' अशी ओळख असलेल्या लोअर परेल परिसरात अनेक कार्यालय आहेत. वाहनं आणि पादचाऱ्यांसाठी पूल बंद करण्यात आल्याने सकाळी गर्दीच्यावेळी एकच गोंधळ उडाला होता. गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये महापालिका यंत्रणेने गर्दी नियोजनासाठी कोणत्याही प्रकारची व्यवस्था केली नव्हती. हा पूल बंद असल्याने कोणताही पर्यायी रस्ताही उपलब्ध न केल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.

दुरुस्तीसाठी रेल्वे पूल बंद
लोअर परेल रेल्वे पुलाच्या दुरुस्तीचं काम आजपासून (24 जुलै) सुरु झालं आहे. त्यामुळे दुरुस्तीचं काम पूर्ण होईपर्यंत पूल बंद राहणार असल्याचं रेल्वे प्रशासनाकडू सांगण्यात आलं आहे. मुंबईतील अंधेरीच्या गोखले पुलाचा स्लॅब कोसळल्यानंतर रेल्व प्रशासन, आयआयटी मुंबई आणि महापालिका अधिकारी यांनी केलेल्या सेफ्टी ऑडिटनंतर, लोअर परेल रेल्वे ब्रिज धोकादायक असून तो तात्काळ बंद करण्यात, यावा असा आदेश देण्यात आला आहे. त्यामुळे सार्वजनिक सुरक्षतेसाठी लोअर परेल रेल्वे ब्रिज (ना. म. जोशी मार्ग) हा वाहनांना वाहतुकीसाठी आणि पादचाऱ्यांना बंद करण्यात आला आहे.