वाहतूकदारांच्या संपाचा फटका, बटाट्याचे दर वधारले!
विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई | 24 Jul 2018 01:09 PM (IST)
तर दुसरीकडे कांद्यावर कोणताही परिणाम झालेला नाही. कांद्याची आवक नेहमीप्रमाणेच म्हणजे 130 ते 150 गाड्या होत आहे.
नवी मुंबई : नवी मुंबईतील एपीएमसीमध्ये भाजीपाला, कांदा आवक सुरळीत असली तरी बटाटा आवकीवर मात्र परिणाम झाला आहे. आवक कमी असल्याने बटाट्याचे भाव तीन ते चार रुपयांनी वाढले आहेत. 12 ते 13 रुपये प्रतिकिलोवरुन 16 ते 17 रुपये किलो बटाटा एपीएमसी मार्केटला विकला जात आहे. ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट असोसिएशनकडून बेमुदत संप सुरु असल्याने उत्तर प्रदेशमधून येणाऱ्या बटाटा आवकीवर परिणाम झाला आहे. जास्त माल हा उत्तर प्रदेशमधून येत असतो. बंदमुळे तिथून माल येण्यास अडथळा झाल्याने गुजरातहून बटाटे येत आहेत. एपीएमसीमध्ये नेहमी 70 ते 80 गाड्यांची आवक होत असते. मात्र तीन दिवसांपासून ही आवक 40 ते 55 गाड्यांवर आली आहे. मालवाहतूकदारांच्या बंदमुळे ही संख्या 30 टक्क्यांनी घटली आहे. परिणामी बटाटे तीन ते चार रुपयांनी महागले आहेत. तर दुसरीकडे कांद्यावर कोणताही परिणाम झालेला नाही. कांद्याची आवक नेहमीप्रमाणेच म्हणजे 130 ते 150 गाड्या होत आहे. उद्या कांदा, बटाटा, धान्य मार्केट बंद दरम्यान, मराठा समाजाने उद्या नवी मुंबई आणि पनवेल बंदची हाक दिली आहे. नवी मुंबईत पार पडलेल्या सकल मराठा समाजाच्या बैठकीत हा निर्णय झाला. त्यामुळे उद्या भाजीपाला, फळ मार्केट सोडून कांदा, बटाटा, मसाला, धान्य मार्केट बंद राहणार आहे.