मुंबई : मुंबईत चालत्या रिक्षावर झाडाची फांदी कोसळून एका प्रवाशाला प्राण गमवावे लागले, तर महिला प्रवासी आणि रिक्षाचालक गंभीर जखमी झाले आहेत. मुलुंड कॉलनीमधील हिंदुस्थान चौकात घडलेल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.


झाड किंवा झाडाची फांदी कोसळून पादचाऱ्यांचा मृत्यू होण्याच्या घटना वारंवार समोर येत आहे. मंगळवारी चालत्या रिक्षावर झाडाची फांदी पडली. यामध्ये डोंबिवलीत राहणाऱ्या 32 वर्षीय रवी शाह याचा मृत्यू झाला, तर 27 वर्षीय उर्वी शाह आणि 40 वर्षीय रिक्षाचालक चंद्रभान रमाशंकर गुप्ता गंभीर जखमी झाले आहेत.

मुलुंडमध्ये मुलुंड कॉलनी परिसरात असलेल्या हिंदुस्थान चौकात दुपारी दोन वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

विशेष म्हणजे याच झाडाच्या फांद्या यापूर्वी तीन वेळा रस्त्यावर कोसळल्या होत्या. त्यावेळी कोणीही जखमी झालं नसलं, तरी स्थानिकांनी याची तक्रार दिली होती. मात्र यावेळी जीवितहानी झाल्यामुळे रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही घटना घडल्याचा आरोप केला जात आहे.

झाड पडून मृत्यू झालेल्या घटना

* 22 जुलै 2017 - दूरदर्शनच्या माजी वृत्त निवेदिका कांचन रघुनाथ यांचा मॉर्निंग वॉकला जाताना अंगावर नारळाचं झाड कोसळून मृत्यू

* 23 जुलै 2017 - ठाण्यातल्या पाचपखाडी परिसरात झाड कोसळून वकील किशोर पवार यांचा मृत्यू

* 7 डिसेंबर 2017 - चेंबूरमध्ये डायमंड गार्डन परिसरात बसस्टॉपवर झाड कोसळून शारदा घोडेस्वार यांचा मृत्यू

* 19 एप्रिल 2018 - दादर पूर्व भागात दिनेश सांगळे यांचा अंगावर झाड कोसळून मृत्यू

* 29 मे 2018 - वाळकेश्वरमध्ये सुखी लीलाजी यांचा अंगावर झाडाची फांदी पडून मृत्यू

* 24 जुलै 2018 - मुलुंड कॉलनीमध्ये रिक्षावर झाडाची फांदी कोसळून 32 वर्षीय रवी शाह याचा मृत्यू

संबंधित बातम्या
मुंबईत झाडाची फांदी अंगावर पडून महिलेचा मृत्यू

मुंबई पालिकेच्या हलगर्जीमुळे दूरदर्शनच्या माजी निवेदिकेचा बळी?

ठाण्यात अंगावर झाड पडून वकिलाचा मृत्यू