मुंबई : मुंबईतील लोअर परेलचा ब्रिज फक्त पादचाऱ्यांसाठी खुला करण्यात येणार आहे. धोकादायक असल्यामुळे हा उड्डाणपूल बंद करण्यात आला होता. महापालिका आणि रेल्वे अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा पूल पुन्हा खुला करण्याचा निर्णय घेण्यात आला.
वाहतूक आणि पादचाऱ्यासाठी मंगळवारपासूनच प्रशासनाने हा पूल बंद केला होता. त्यामुळे स्थानिक नागरिकांना प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं लागत असल्याची ओरड केली होती.
महापालिका, रेल्वे, आयआयटी आणि स्थानिक प्रतिनिधींनी काल पुन्हा या ब्रिजची पाहणी केली. त्यानंतर केवळ पादचाऱ्यांसाठी हा ब्रिज पुन्हा खुला करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र पश्चिम रेल्वेवरील ब्रिजचा भाग हा बंदच राहणार आहे.
लोअर परेल स्थानकातून बाहेर पडण्यासाठी फक्त एक पूल उपलब्ध आहे, पण तो लहान आहे. पूल उतरल्यावर खाली चिंचोळी गल्ली आहे, त्यातच रस्त्यावर बाईक पार्क असतात. तिथून बाहेर पडायला प्रवाशांना 20 ते 25 मिनिट लागत आहेत.