कल्याण : प्रेयसीच्या वडिलांना प्रेमप्रकरणाची तक्रार करणाऱ्या इसमाची प्रियकराने हत्या केल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह एकूण तिघांना अटक केली आहे. गणेश भोईर असं आरोपी प्रियकराचं नाव आहे.


डोंबिवलीच्या विष्णूनगर परिसरात मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. या भागात राहणाऱ्या आणि सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या गणेश भोईर याचे त्याच परिसरात राहणाऱ्या उत्तर भारतीय तरुणीशी प्रेमसंबंध होते. मात्र याचा सुगावा याच परिसरात पानटपरी चालवणाऱ्या राकेश यादव याला लागला. यादव याची संबंधित तरुणीच्या वडिलांशी चांगली ओळख असल्यानं त्याने याबाबत त्यांना माहिती दिली.

त्यानंतर तरुणीचे वडील या तरुणीसह संपूर्ण परिवाराला घेऊन उत्तर प्रदेशात निघून गेले. यानंतर टपरी चालक राकेश यादव याच्यामुळे आपलं आपली प्रेयसीशी ताटातूट झाल्याची माहिती गणेश भोईरला मिळाली आणि त्याने आपल्या दोन मित्रांसह मंगळवारी रात्री दोनच्या सुमारास राकेशला गाठत त्याच्यावर धारदार शस्त्रांनी वार केले. या घटनेत राकेश यादवचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर काही तासातच पोलिसांनी रेल्वे फाटक परिसरातून तिन्ही आरोपींना अटक केली.