कल्याण : दिव्याच्या डम्पिंगचा प्रश्न पुढच्या वर्षभरात सोडवू, असा विश्वास कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे. दिवा परिसरात काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीत श्रीकांत शिंदे बोलत होते.

श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी शिवसेनेनं आज दिवा आणि ग्रामीण परिसरात प्रचार रॅली काढली. या रॅलीतून सेनेनं ग्रामीण भागात मोठं शक्तीप्रदर्शन केलं. दिव्याच्या साबे गावापासून दिवा शहर, मुंब्रादेवी कॉलनी, दातिवलीपर्यंत ही रॅली काढण्यात आली.

यावेळी दिवावासीय हजारोंच्या संख्येने या रॅलीत सहभागी झाले होते. यावेळी बोलताना गेल्या पाच वर्षात आपण दिव्याची बकाल अवस्था दूर करण्याचा प्रयत्न केला असून दिवावासीयांना पक्के रस्ते दिल्याचं डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले. तसेच पुढच्या वर्षभरात दिवा डम्पिंगचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे आनंद परांजपे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.