मुबंई : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसबाहेर बुधवारीही स्थलांतरित मजुरांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. सीएसएमटीहून परराज्यांसाठी सुटणाऱ्या विशेष श्रमिक गाड्यांचा सिलसिला बुधवारी कायम होता. बेस्ट, एसटी, खाजगी बसेसमध्ये भरून राज्यातील परराज्यात जाणाऱ्या मजुरांना रेल्वे स्टेशनपर्यंत आणण्यात येत आहे. सीएसएमटी जंक्शनहून ईस्टर्न एक्स्प्रेसवेकडे जाणारा रस्ता यासाठी पोलिसांनी वाहतुकीसाठी बंद करून टाकला आहे.


ज्यांची नावं यादीत आहेत त्यांना पार्किंगच्या मुख्य प्रवेशद्वारावर सॅनिटाईज करून स्टेशनच्या आवारात प्रवेश दिला जात आहे. मात्र असे शकडो लोक स्टेशनबाहेरच्या फूटपाथवर ठाण मांडून बसले आहेत, ज्यांना इथवर आणण्यात आलं खरं मात्र काही कारणाने त्यांना स्टेशनमध्ये प्रवेशच मिळू शकला नाही. यातील बरेचसे लोक मंगळपासून इथेच थांबून आहेत. यांना 'तुमची गाडी रद्द झालीय', 'ती आज येणार नाही तेव्हा तुम्ही नंतर या' अशी कारण दिली गेली आहेत.


पोलीस कर्मचारी यांना पुन्हा घरी परतण्याची सूचना देत आहेत. पण दोन अडीच महिन्यांच्या लॉकडाऊननंतर आपल्या मूळगावी, आपल्या घरी आपण परतणार या आशेनं यातील बरेचसे लोक आपला सारा गोतावळा गुंडाळून आलेत. आता इतक्यात परत मुंबईत परतायचं नाही, या उद्देशानं आपली भाड्याची खोली, झोपडी खाली करून हे लोकं स्टेशनवर दाखल झालेत. त्यामुळे आता ते मागे परतू शकत नाहीत. केवळ घराकडे जाणाऱ्या गाडीत बसणं किंवा आहेत त्या फुटपाथवर आपल्या कुटुंबासह बसून वाट पाहात बसणं, एवढंच त्यांच्या हातात आहे. त्यांच्यासमोर इतर पर्यायच शिल्लक नाहीत.


कोलकाता, पश्चिम बंगाल इथं जाण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या यापैकी काही मजुरांनी एबीपी माझाशी बोलताना महाराष्ट्र सरकार आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममतादीदी यांना साकडं घालत मदतीची याचना केली आहे. तेव्हा यांच्यासारख्या अशा असंख्य मजुरांना त्यांच्या राज्यात, त्यांच्या घरापर्यंत सुखरूप पोहोचवणं ही महाराष्ट्र सरकार आणि इतर राज्य सरकारांसह केंद्र सरकारचीही तितकीच जबाबदारी आहे, अशी भावना या मजुरांनी बोलून दाखवली.


Lockdown 4.0 | वसईच्या सनसिटी मैदानात सलग दुसऱ्या दिवशी मजुरांची गर्दी