मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता दहावी बोर्डाचा भूगोलाचा पेपर हा रद्द करण्यात आला होता. मात्र, हा पेपर रद्द झाल्यानंतर या विषयाचे नेमके गुण कसे द्यायचे? याबाबत अखेर आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने निर्णय घेतला आहे. दहावी बोर्डच्या इतर विषयांचे लेखी पेपरचे गुणांची सरासरी काढून ही सरासरी विचारात घेऊन भूगोल विषयाचे 40 पैकी गुण दिले जाणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे दहावीचा निकाल जाहीर करताना अनेकांमध्ये जो संभ्रम निर्माण झाला होता त्यावर बोर्डाने हा संभ्रम पत्रक काढून दूर केला आहे.
भूगोलाचा 23 मार्च रोजी रद्द झालेल्या पेपरची गुणपद्धती तशी असावी? याकडून मंडळाकडून विहित कार्यपद्धती वापरण्यात आली आहे. मंडळाने याबाबत तयार केलेला प्रस्ताव हा शासनाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. त्याला शासनाची मंजुरी मिळण्यानंतर आता या गुणपद्धतीनुसार सरासरी गुण हे भूगोल या विषयासाठी दिले जाणार असून दहावी निकाल जाहीर करण्याचे प्रयत्न बोर्डाकडून केले जात असल्याची, मंडळाच्या अध्यक्षा शंकुतला काळे यांनी माहिती दिली. दहावीच्या मराठी, इंग्रजी, द्वितीय भाषा, विज्ञान, गणित आणि इतिहास या विषयाचे पेपर मार्च महिन्यात झाल्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याचे लक्षात येताच शिक्षण विभागाने उर्वरित भूगोलाचा पेपर रद्द करण्याचे जाहीर केले होते. मात्र, या पेपरचा गुणाबाबात अनिश्चिता असल्याने निकाल कसा जाहीर करायचा असा प्रश्न अनेक शिक्षकांना पडला होता.
औरंगाबाद विभागीय मंडळाचा अजब आदेश; राज्यातील दहावी, बारावीचा निकाल लांबण्याची शक्यता
आता भूगोलाच्या पेपरच्या गुणाबाबातचा तिढा जरी सुटला असला तरी दहावीचा निकाल कधी जाहीर होणार याबाबत अजूनही स्पष्टता देण्यात आलेली नाही. दहावी पेपर तपासणीचे काम सुरू असून रेड जोन असलेल्या भागात अनेक ठिकाणी अडचणीतून मार्ग काढत पेपर तपासणीसाठी परवानगी मिळाल्यानंतर पेपर तपासणीचा काम सुरू आहे. मात्र 10 जूनपर्यंत दरवर्षी जाहीर होणार निकाल यावर्षी वेळेत जाहीर होणार का? याबाबत मात्र अद्याप सांगणं कठीण असल्याच चित्र आहे. तरी निकाल लवकरात लवकर कसा जाहीर करता येईल त्या दृष्टीने बोर्डाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याच सांगितलंय.
SSC-HSC Exam Result | दहावी-बारावीच्या निकालासाठी शिक्षकांना संचारबंदीत प्रवासाला परवानगी