मुंबई : वसई ते पनवेल लोकल चालवण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी मागील वेळी रेल्वे अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत याबाबत विचारणा केली होती. त्यामुळे मुंबई रेल विकास प्राधिकरणाने लोकल चालवण्यासंदर्भात फिजिबिलिटी रिपोर्ट तयार करण्यास सुरुवात केली आहे.


सध्या वसई ते पनवेल या मार्गावर मेमू गाडी चालते. वसई ते पनवेल हे अंतर पार करायला मेमु गाडी दीड तास घेते आणि एकूण 11 स्थानकांच्या दरम्यान ही मेमु धावते. यात तळोजा, भिवंडी, दातीवली, कळंबोली अशी महत्त्वाची स्थानके आहेत.

या मार्गावर लोकल चालविल्यास त्याचा मोठा फायदा इथल्या वाढलेल्या लोकसंख्येला होऊ शकतो. मात्र त्यासाठी अनेक बदल करावे लागणार आहेत. सिग्नल यंत्रणा अद्ययावत करणे, प्लॅटफॉर्मची उंची, फलाट आणि लोकल मधील अंतर कमी करणे, अशी अनेक कामे हाती घ्यावी लागतील. एमआरव्हीसी याबाबत अभ्यास करून आपला रिपोर्ट देणार आहे. त्यानंतर या मार्गावर लोकल धावू शकेल.