मुंबई : दिव्यांगांचे जीवनमान सुधारावे, त्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी महिला व बाल कल्याण योजनेअंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सुमारे ४० ते ८० टक्के दिव्यांग व्यक्तींसाठी 'धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य' योजनेतंर्गत (Dharmaveer Anand Dighe Disability Financial Assistance Scheme)  एक रकमी अर्थसहाय्य करण्यात येत आहे. सन २०२४-२५ ते सन २०२८-२९ या पाच वर्षांच्या कालावधीकरिता या योजने अंतर्गत दरमहा एक ते तीन हजार रुपयांपर्यंत अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. दिव्यांग व्यक्तीकडे पिवळे अथवा निळे वैश्विक ओळखपत्र (UIAD CARD) असणे आवश्यक आहे


महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात ही योजना राबविण्यात येत आहे. पुढील पाच वर्षांच्या कालावधीपर्यंत सुमारे ६० हजार दिव्यांग लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. यासाठी दरवर्षी १११.८३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.


दिव्यांग बांधवांनी असा करावा अर्ज


या योजनेअंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कायमस्वरुपी रहिवाशी असलेल्या दिव्यांगांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनेसाठी पात्रतेचे निकष, योजनेच्या अर्टी, शर्ती, आवश्यक कागदपत्रे व अर्जाचा नमुना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासाठी संकेतस्थळ https://portal.mcgm.gov.in येथे About BMC – Departments - Department Manuals-Assistant Commissioner Planning-Docs- दिव्यांग व्यक्तींसाठी ‘धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य योजना (सन २०२४-२५ ते सन २०२८-२९)’ यावर क्लिक केल्यास तेथे अर्जाचा नमुना उपलब्ध होईल. सदर योजनेचे अर्ज भरण्यास अंतिम मुदत नाही. सर्व कागदपत्रांसहित पूर्ण भरलेले अर्ज सर्व संबंधित विभाग कार्यालयात सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत जमा करावेत.


बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बृहन्मुंबई महानगरपालिका कार्य क्षेत्रात ही योजना राबविण्यात येत आहे.


बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कायमस्वरुपी रहिवासी असलेल्या दृष्टी नसलेले, कर्णबधीर, अस्थिव्यंग, मनोविकलांग व इतर प्रकारचे शारीरिक व्यंगत्व आलेल्या दिव्यांग व्यक्तींना सामान्य जीवन जगता यावे, योग्य औषधोपचार व आहार घेता यावा व व्यंगत्वामुळे अर्थार्जन आणि जीवनमान सुधारणांची संधी गमावल्यामुळे आलेले परालंबित्व कमी व्हावे, यासाठी 'धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य योजना' सुरू करण्यात येत आहे. महानगरपालिकेच्या नियोजन विभागाकडून दिव्यांग बांधवांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.  


या दिव्यांग बांधवांना मिळणार योजनेचा लाभ


या योजने अंतर्गत वय वर्ष १८ वरील ४० टक्के दिव्यंगत्व आलेल्या व्यक्तींना दरमहा एक हजार रुपये या हिशोबाने दर सहा महिन्यानंतर एकत्रित सहा हजार रुपये याप्रमाणे वितरित करण्यात येईल. म्हणजेच वार्षिक १२ हजार रुपये मिळतील. तसेच ८० टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींना दरमहा तीन हजार रुपये या हिशोबाने दर सहा महिन्यानंतर एकत्रित १८ हजार रुपये याप्रमाणे वितरित करण्यात येईल. म्हणजेच वार्षिक ३६ हजार रुपये मिळतील. या दोन्ही गटातील दिव्यांगांना पुढील पाच वर्षांकरिता हा लाभ मिळणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी सदर दिव्यांग व्यक्तीकडे पिवळे अथवा निळे वैश्विक ओळखपत्र (UIAD CARD) असणे आवश्यक आहे.