मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मुंबईत सुरु असलेल्या पावसाचा जोर आणखीनच वाढला आहे. गुरुवारी पहाटेपासून मुंबई शहर आणि उपनगर परिसरात तुफान पाऊस (Mumbai Heavy Rain) सुरु आहे. गेल्या काही तासांपासून मुंबईत बरसत असलेल्या पावसाचा जोर खूपच जास्त आहे. या सरींची तीव्रता जास्त आहे. त्यामुळे अनेक भागांमध्ये रस्त्यांवर गटार आणि डोंगराळ भागातील माती आणि राडारोडा रस्त्यावर वाहून आला आहे. त्यामुळे मुंबईकरांची आजची सकाळ त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. 


हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार गुरुवारी मुंबईत मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. त्यानुसार आज पहाटेपासून जोरदार पाऊस सुरु झाला आहे. आकाशात काळेकुट्ट ढग दाटून आल्याने पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. गेल्या काही तासांपासून पावसाच्या जोरदार सरी मुंबई शहर आणि उपनगर परिसराला झोडपून काढत आहेत. त्यामुळे मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे. 


लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता


मुंबईत पहाटेपासून सुरु असलेल्या तुफान पावसाचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. सध्याच्या पावसाचा जोर पाहता मध्य रेल्वेमार्ग आणि हार्बर रेल्वेमार्गावरील ठरलेल्या स्थानकांच्या परिसरात रेल्वे ट्रॅकवर पाणी साचण्याची शक्यता आहे. सध्या मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेवरील लोकल ट्रेन 5 ते 10 मिनिटांच्या उशीराने धावत आहेत. तर पश्चिम रेल्वेमार्गावरील वाहतूकही विलंबाने आहे. आणखी काही तास पावसाचा जोर कायम राहिल्यास मुंबईतील लोकल ट्रेनची वाहतूक ठप्प होण्याची किंवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे.


ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवलीतही तुफान पाऊस


ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्याला हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे या सर्व ठिकाणी आज पहाटेपासून तुफान पाऊस सुरु आहे. कल्याण-डोंबिवली आणि ठाण्यातील अनेक भागांमध्ये रस्त्यावर पाणी साचले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास सकाळच्या वेळेत कामावर जाणाऱ्या चाकरमन्यांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.


पुण्यात रात्रभर मुसळधार पाऊस, खडकवासला धरणातून वेगाने पाण्याचा विसर्ग


 पुण्यात रात्रभर तुफान पाऊस (Pune Heavy Rain) सुरु आहे. मुसळधार पावसामुळं सिंहगड रस्ता (Sinhagad Road) 5 सोसायटीमध्ये पाणी घुसले आहे. खडकवासला धरणातून (Khadakwasla Dam) सोडण्यात येणारा पाण्याच्या विसर्ग वाढवण्यात आला आहे. हवामान विभागाने येत्या काही तासात पुणे शहर, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे या तालुक्यांमध्ये शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.



आणखी वाचा


पुण्यात मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत, शाळांना सुट्टी जाहीर, खडकवासला धरणातून विसर्ग वाढवला