मुंबई : एका बॅगमुळे हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक पूर्णत: विस्कळीत झाली आहे. वाशी स्टेशवर पेंटाग्राफवर बॅग पडल्याने आग लागली. परिणामी पनवलेला जाणाऱ्या गाड्या 10 ते 15 मिनिटं उशिराने धावत आहेत. आज सकाळी साडेनऊच्या सुमारास वाशी स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर ही घटना घडली. ज्या लोकलवर बॅग पडली ती पनवेलला जाणारी होती.


बॅग पेंटाग्राफवर पडल्याने आग लागली आणि प्रचंड धूर येऊ लागला. परिणामी लोकल बंद करण्यात आली. वाशी स्टेशनवर 12 मिनिटं थांबवली होती. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवून ती लोकल सानपाडा कारशेडला रवाना करण्यात आली. त्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरु झाली. मात्र या लोकलनंतर धावणाऱ्या सर्वच गाड्या रखडल्या आणि 10 ते 15 मिनिटं उशिराने धावू लागल्या.


ही बॅग कोणाची होती, ती कशी पडली की कोणी फेकली याबाबत चौकशी सुरु आहे. मात्र यामुळे हार्बर लाईनवरील सर्वच गाड्या उशिराने धावत आहेत.

दरम्यान, वाहतुकीमध्ये अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी प्रवाशांनी बॅग किंवा इतर वस्तू ट्रेनवर फेकू नये, अशी विनंती मध्य रेल्वेकडून करण्यात आली आहे.