मुंबई : विधानसभा निवडणुकीत ज्यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली त्यांची उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यात जाहीर माफी मागितली. अनेकांनी तयारी केली होती, मात्र तिकीट न मिळाल्याने ते नाराज असल्याने उद्धव ठाकरेंनी ही भूमिका घेतली.
महाराष्ट्रात जिथे जिथे शिवसैनिकांनी तयारी केली, मात्र तिथे जागा सुटली नाही, या सगळ्यांची मी वैयक्तिक माफी मागतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले. मात्र एक गोष्ट लक्षात घ्या, तुमची ताकद कधीही कुठेही कमी पडू देऊ नका. प्रत्येक गावातील, प्रत्येक खेड्यातील प्रत्येक घरामध्ये शिवसेना आणि शिवसैनिक हा असलाच पाहिजे. तुमच्या सारखे शिवसैनिक मिळायला भाग्य लागतं. मी केवळ माँ आणि बाळासाहेबांचा पुत्र असल्याने मला हे भाग्य लाभलं असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
निवडणुकीत अत्यंत प्रामाणिकपणाने युतीचं काम करायचं आणि विधानसभेवर आपल्या युतीचा भगवा फडकवायचा, हा भगवा आपल्या शिवरायांचा भगवा आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी युती केली आहे. वादळ आलं की सगळा पालापाचोळा उडून जातो, असं म्हणतात. मला भगवं वादळ काय असतं हे दाखवून द्यायचं आहे, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी शिवतीर्थावरुन केलं.
उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यातील आपल्या भाषणात विरोधकांवरही तोफ डागली. शिवसेनेचा वचननामा अजून जाहीर झाला नाही, मात्र आपल्या भाषणातून शेतकरी, ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि सर्वसामन्य जनतेसाठी काही घोषणा उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यात केला.
VIDEO | उद्धव ठाकरेंचं दसरा मेळाव्यातील संपूर्ण भाषण
उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
- महाराष्ट्रात पुन्हा भगवा फडकणार असल्याचा विश्वासही उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला.
- एकाच महिन्यात दोन विजयादशमी. एक आजची आणि दुसरी 24 तारखेची.
- राम मंदिराच्या जागी राम मंदिर व्हायलाच पाहिजे - उद्धव ठाकरे
- विशेष कायदा करा आणि अयोध्येत रामजन्मभूमीच्या ठिकाणी राम मंदिर बांधा ही शिवसेनेची मागणी- उद्धव ठाकरे
- अयोध्येत राम मंदिर व्हावं, ही बाळासाहेबांची इच्छा - उद्धव ठाकरे
- आमचा कारभार प्रभू रामचंद्रासारखा असेल, जनतेच्या सेवेसाठी आम्ही वचनबद्ध आहोत- उद्धव ठाकरे
- शिवसेना-भाजपची युती प्रामाणिक आहे - उद्धव ठाकरे
- भाजपला पाठिंबा दिला नसता तर 370 कलम काढा सांगणाऱ्या काँग्रेसला पाठिंबा द्यायचा? - उद्धव ठाकरे
- अजित पवार यांच्या डोळ्यात अश्रू पाहून मला मगरीच्या डोळ्यातले अश्रू आठवले - उद्धव ठाकरे
- सुशीलकुमार म्हणतात की आघाडी थकलीय. वयामुळे नाही तर भ्रष्टाचारामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी थकली आहे - उद्धव ठाकरे
- मराठा समाजाला जसं आरक्षण दिलं, तसं धनगरांना आरक्षण द्या - उद्धव ठाकरे
- देशावर प्रेम करणारे मुसलमान आमच्या सोबत आले, तर आम्ही त्यांचे सुद्धा न्यायहक्क मिळवून देऊ - उद्धव ठाकरे
- पुन्हा सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार- उद्धव ठाकरे
- राज्यात दहा रुपयांत पूर्ण अन्न देणार - उद्धव ठाकरे
- रोगराई वाढतेय, एक रुपयात प्राथमिक आरोग्य चाचण्या आणि त्यांची केंद्रे संपूर्ण महाराष्ट्रभर उभारणार - उद्धव ठाकरे
- ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी मोफत बस सेवा देणार- उद्धव ठाकरे
- 300 युनिटचा घरगुती वीज वापराचा दर 30 टक्क्यांनी कमी करणार - उद्धव ठाकरे
- जागा कमी पडल्या तरी, ताकद कमी पडू देऊ नका - उद्धव ठाकरे
- ज्यांचं तिकीट कापलं, त्यांची माफी मागतो - उद्धव ठाकरे