मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभांचा धुरळा, धुळ्यात मुख्यमंत्री, संगमनेरमध्ये उद्धव ठाकरे तर अकोल्यात शरद पवारांची सभा विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभरात प्रचारसभांचा धडाका लागला आहे. आज राज्यात बड्या नेत्यांच्या सभेचा धुरळा उडणार आहे. धुळे जिल्हात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संगमनेरमध्ये उद्धव ठाकरे, पुण्यात राज ठाकरे तर अकोल्यात शरद पवार यांच्या सभा होणार आहेत. या सभांसाठी सर्वच पक्षांनी जय्यत तयारी केली असून या सभांमध्ये हे नेते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. धुळे, शहादा, शिरपूर, साक्री आणि नेर गावात मुख्यमंत्र्यांच्या सभा पार पडणार आहेत. धुळे जिल्ह्यातील साक्री, शिरपूर या राखीव मतदारसंघात काँग्रेसचे वर्चस्व आहे. धुळे ग्रामीण मतदारसंघ हा गेल्या 35 वर्षांपासून काँग्रेसच्या ताब्यात आहे. धुळे ग्रामीण मतदारसंघ हा शिवसेनेच्या वाट्याला येणारा मतदारसंघ, मात्र यंदा प्रथमच हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आला. काँग्रेसचे कुणाल पाटील विरुद्ध भाजपच्या ज्ञानज्योती भदाणे यांच्यात लढत होत आहे. साक्रीत भाजपचे मोहन सुर्यवंशी, काँग्रेसचे धनाजी सीताराम अहीरे तसेच भाजपच्या बंडखोर मंजुळा गावित अशी लढत राहणार आहे. तर शिरपूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार काशीराम पावरा यांनी भाजपात प्रवेश केला असून त्यांना भाजपने उमेदवारी दिल्यानं निष्ठावंत कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. भाजपचे डॉ.जितेंद्र ठाकूर यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे. धुळे शहर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेकडे गेल्यानं शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी हे युतीचे उमेदवार आहेत. त्यांच्यासमोर भाजपचे माजी आमदार अनिल गोटे, राष्ट्रवादीचे माजी आमदार सध्या अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात असलेले राजवर्धन कदमबांडे हे उमेदवार आहेत. अनिल गोटे हे महा आघाडीचे पुरस्कृत उमेदवार आहेत.
शरद पवारांच्या सभांचा धडाका
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याही सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे. पवारांची पहिली सभा सकाळी अकरा वाजता अकोला जिल्ह्यातील बाळापूर इथं होणार आहे. तर दुसरी सभा दुपारी चार वाजता वाशीम जिल्ह्यातील मानोरा-कारंदा इथं होणार आहे.
उद्धव ठाकरे अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर
दुसरीकडे उद्धव ठाकरे आज प्रचारासाठी अहमनदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ अहमदनगर जिल्ह्यातून फोडत आहेत. त्यांची पहिली प्रचारसभा संगमनेरमध्ये होत आहे. आज दिवसभरात उद्धव ठाकरे अहमदनगर जिल्ह्यात चार सभा घेतील. उद्धव ठाकरे यांचा दुसरा मुलगा तेजस ठाकरे पहिल्यांदाच प्रचार सभेत दिसून येणार आहे. तर दुसरीकडे युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे हे कोल्हापुरातील चंदगड, गागल भागात दौरा करणार आहेत.
राज ठाकरे पुण्यातून प्रचाराचा नारळ फोडणार
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यातून प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. नातूबाग परिसरातल्या सरस्वती मंदिर मैदानात राज ठाकरेंची सभा होणार आहे. काल राज ठाकरेंनी पुण्यातील कोथरूडमध्ये मनसे उमेदवार किशोर शिंदे यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन केलं. आश्चर्य म्हणजे या उद्घाटन सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेही उपस्थित होते. त्यामुळं कोथरुडमध्ये चंद्रकांत पाटलांचा पराभव करण्यासाठी सर्व विरोधक एकवटले आहेत.
यासोबतच भाजपचे कणकवलीचे उमेदवार नितेश राणेंच्या प्रचारासाठी विनोद तवाडे आणि प्रविण दरेकरांची सभा होणार आहे. सांगलीत काँग्रेसचे उमेदवार विश्वजित कदम यांच्या प्रचारासाठी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांची सभा होणार आहे. मनमाडमध्ये पंकज भुजबळांच्या यांच्या प्रचारासाठी छगन भुजबळांची सभा होणार आहे तर अकोल्यात धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त वंचित बहजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची जाहीर सभा होणार आहे.
प्रचारसभांचा धुरळा, धुळ्यात मुख्यमंत्री, संगमनेरमध्ये उद्धव ठाकरे, पुण्यात राज ठाकरे तर अकोल्यात शरद पवारांची सभा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Oct 2019 10:59 AM (IST)
धुळे जिल्हात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संगमनेरमध्ये उद्धव ठाकरे, पुण्यात राज ठाकरे तर अकोल्यात शरद पवार यांच्या सभा होणार आहेत. या सभांसाठी सर्वच पक्षांनी जय्यत तयारी केली असून या सभांमध्ये हे नेते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -