मुंबई : दोन सज्ञान व्यक्तींनी परस्पर संमतीने ठेवलेले समलैंगिक संबंध कलम 377 अंतर्गत गुन्हा नसल्याचा निर्वाळा सुप्रीम कोर्टाने पाच महिन्यांपूर्वी दिला होता. त्यानंतर मुंबईत पहिल्यांदाच उघडपणे समलैंगिक लग्नाचं रिसेप्शन आयोजित करण्यात आलं होतं. मुंबईतील विनोद आणि फ्रान्सचे विन्सेंट यांनी साताजन्माची गाठ बांधली.


भारतात अद्याप समलैंगिक विवाहाला मान्यता नसली, तरी समलैंगिकतेला गुन्हेगारीच्या कक्षेतून बाहेर आणणं हे 'गे मॅरेज'च्या दिशेने पाऊल असल्याचं एलबीजीटी समुदाय मानतं. रेनबो व्हॉईस मुंबईचे संस्थापक असलेले 43 वर्षीय विनोद फिलीप आणि फ्रान्सचे रहिवासी असलेले त्यांचे 47 वर्षीय मित्र विन्सेंट यांचा विवाह झाला होता.

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात फ्रान्समध्ये त्यांनी लग्न केलं होतं. त्यानंतर मुंबईतील एका हॉटेलमध्ये रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी त्यांचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित होते.

विनोद 2014 साली चेन्नईहून मुंबईत आले. तेव्हापासून त्यांनी एलजीबीटी समुदायासाठी काम करण्यास सुरुवात केली. या शहराने ओळख दिल्यामुळे विनोद यांना मुंबईविषयी विशेष प्रेम होतं. त्यामुळे मुंबईत विवाहसोहळा आयोजित करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

2016 मध्ये एका डेटिंग अॅपच्या माध्यमातून पॅरिसमध्ये दोघांची ओळख झाली होती. चॅटिंग करता-करता दोघांनी डेटिंग सुरु केलं. सहा महिन्यांनंतर ते दोघं एकत्र राहायला लागले. त्यानंतर दोघांना प्रेमाची जाणीव झाली आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

विशेष म्हणजे, हा समलैंगिक विवाह असल्याची माहिती अखेरच्या क्षणापर्यंत हॉटेल व्यवस्थापनापासून लपवण्यात आली होती. मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे याबाबत माहिती मिळताच व्यवस्थापनाने पूर्ण सहकार्य केलं.