मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबई आयआयटीमध्ये गुराढोरांचं वास्तव्य पाहायला मिळत असताना आता आयआयटीच्या हिल साइड भागात बिबट्याचं दर्शन झालं आहे. दोन दिवसापूर्वी मुंबई आयआयटी परिसरातील हिल साइड भागात हा बिबट्या रात्रीच्यावेळी कॅमेरामध्ये कैद झाला आहे. या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांच्या म्हणण्यानुसार मुंबई आयआयटी परिसरात याआधी सुद्धा अनेकदा बिबट्या त्यांनी पाहिला आहे.


आतापर्यंत मोठ्या संख्यने गुरंढोरं मुंबई आयआयटी परिसरात लोकांनी पाहिले आहेत. गुराढोरांचे विद्यार्थ्यावर झालेले हल्ले असू द्या किंवा मग गाईचा वर्गात प्रवेश करणं असू द्या. असे अनेक प्रकार मुंबई आयआयटीमध्ये गेल्या काही दिवसापासून पाहायला मिळत आहेत. मात्र या परिसरात चक्क बिबट्याचा वावर होत असल्याने भीतीचं वातावरण विद्यार्थी आणि तिथे राहणाऱ्या स्थानिकांमध्ये आहे. मुंबई आयआयटीने या प्राण्यांवर नियंत्रण राखण्यासाठी एका समितीची नेमणूक केली आहे. मात्र आता गुराढोरांसोबत बिबट्यासारखे हिंस्त्र प्राणी आयआयटी मुंबई परिसरात प्रवेश करत असतील तर हे धोक्याचं असून यावर लवकर तोडगा काढणं गरजेच आहे.

मुंबई आयआयटीच्या म्हणण्यानुसार नॅशनल पार्कला लागून हा परिसर असल्याने आरे कॉलनी भागातून हे बिबटे आयआयटी तलावाजवळ पाण्याच्या शोधात या ठिकाणी येतात. त्यामुळे येथे आधीपासून असा बिबट्याचा वावर अधूनमधून पाहायला मिळतो. यावर सध्यातरी कोणताही तोडगा निघालेला नाही.

काही दिवसांपूर्वी आयआयटीच्या एका वर्गात गाय शिरली होती. आता जर एखाद्या दिवशी हा बिबट्या गाईसारखा क्लासरूम मध्ये किंवा होस्टेलमध्ये आत शिरला तर आणि कोणावर  हल्ला केला तर हि जबाबदारी कोणाची? हा प्रश्न या ठिकणी उपस्थित केला जात आहे.