मुंबई : मंत्रालयातील महसूल विभागात आज (मंगळवार) डेटा लीकच्या भीतीने अधिकाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली. माहिती तंत्रज्ञान (IT) विभागातील एका संशयित कंत्राटी कर्मचाऱ्याला या प्रकरणात मरीन ड्राइव्ह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. प्रकाश खेडेकर असे या व्यक्तीचं नाव असून त्याचे कंत्राटही रद्द करण्यात आल्याची माहिती संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.


आज पहाटे 7 वाजता हा व्यक्ती महसूल विभागातील 20 संगणकांचे CPU (सेंट्रल प्रोसेसिंग युनिट) उघडून छेडछाड असल्याचे काही सफाई कर्मचाऱ्यांना आढळले. या कर्मचाऱ्यांनी विचारणा केली असता त्याने आयटी विभागातून असल्याचे सांगितले. यानंतर महसूल विभागाच्या एका शिपायाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना या संशयास्पद घटनेची माहिती देण्याचा प्रयत्न केला. मात्र शिपाई त्याठिकाणी परतल्यानंतर तो व्यक्ती तिकडून निघून गेल्याचे लक्षात आले.

या घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी मरीन ड्राइव्ह पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी तपास करून या व्यक्तीला मंत्रालयातील पाचव्या मजल्यावरून ताब्यात घेतले. पोलिसांनी तो काम करत असलेल्या सर्व संगणक आणि पेन ड्राइव्ह्जची तपासणी केली मात्र प्रथमदर्शनी कुठलीही संवेदनशील माहिती आढळली नाही.

पहिल्या मजल्यावर असलेल्या महसूल विभागातील संगणकांचाही तपास करण्यात येत आहे. महसूल विभागात जमिनींचा मालकी हक्क, त्यातून जमा होणाऱ्या महसुलाचा तपशील, भाडेपट्ट्याने दिलेल्या सरकारी जमिनींचा लेखाजोखा आणि जमिनींचे तंटा-वाद प्रकरणांच्या माहितीचा डेटा या संगणकांमध्ये उपलब्ध असतो. मात्र यापैकी कुठल्या माहितीचा दुरुपयोग किंवा चोरी करण्याच्या हेतूने या संशयिताने हे कृत्य केले आहे का? याचा तपास पोलीस करत आहे.