मुंबई : मुंबईची 'लाईफलाईन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकलवर दगडफेक करणाऱ्यांमुळे मुंबईकरांची 'लाईफ' धोक्यात आली आहे. दररोज सुमारे एक कोटीहून अधिक प्रवासी मुंबई लोकलमधून प्रवास करतात. त्यामुळे लोकलमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. त्यामुळे प्रवाशांना जीव धोक्यात घालून रेल्वेच्या दरवाजात उभे राहून प्रवास करावा लागतो. परंतु काही समाजकंटक अधून-मधून लोकलवर दगडफेक करतात. त्यामध्ये प्रवासी गंभीर जखमी होतात. अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. परंतु या समाजकंटकांना आळा घालण्यात रेल्वे प्रशासन अपयशी ठरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
2013 ते जून 2019 या साडेसहा वर्षांच्या कालावधीत मुंबईतील रेल्वेगाड्यांवरील दगडफेकीच्या एकूण 118 घटना समोर आल्या आहेत. या घटनांमध्ये तब्बल 113 प्रवासी जखमी झाले असल्याचे माहिती अधिकार कायद्यातून पुढे आले आहे. या 118 घटनांपैकी केवळ 21 प्रकरणे सोडविण्यात जीआरपीला यश मिळाले असून 20 आरोपींना अटक करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे दगडफेकीच्या बहुतेक घटना मध्य रेल्वे मार्गावर घडल्या आहेत. कर्जत ते सीएसएमटीदरम्यान झालेल्या एकूण 84 दगडफेकीच्या घटनांमध्ये एकूण 81 प्रवासी जखमी झाले आहेत.
रेल्वे प्रोटेक्शन फोर्सकडून (आरपीएफ) दगडफेकीच्या घटनांना आळा घालण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. ज्या ठिकाणी दगड मारण्याच्या घटना जास्त आहेत, तिथे सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत.
दगडफेकीच्या घटनांची आकडेवारी
2013 साली 16 दगडफेकीचे गुन्हे दाखल झाले होते. यात 3 गुन्ह्यांची उकल करण्यात आली, 3 आरोपींना अटक झाली.
2014 साली दगडफेकीचे 21 गुन्हे दाखल झाले होते. त्यामध्ये 4 गुन्ह्यांची उकल करण्यात आली, 4 आरोपींना अटक झाली
2015 साली दगडफेकीचे 16 गुन्हे दाखल झाले होते. यात केवळ एका गुन्ह्यांची उकल करण्यात आली त्यामध्ये एका आरोपीला अटक झाली.
2016 साली दगडफेकीचे 12 गुन्हे दाखल झाले होते. यात 9 गुन्ह्यांची उकल करण्यात आली आणि एका आरोपीला अटक झाली.
2017 साली दगडफेकीचे 15 गुन्हे दाखल झाले होते. यात 4 गुन्ह्यांची उकल करण्यात आली, 3 आरोपींना अटक झाली.
2018 साली दगडफेकीचे 27 गुन्हे दाखल झाले होते. त्यामध्ये ४ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आणि 4 आरोपींना अटक झाली.
जून 2019 पर्यंत दगडफेकीचे 11 गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामध्ये 4 गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून केवळ 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मुंबई लोकलवर दगडफेकीच्या 118 घटना, 113 प्रवासी जखमी, जीआरपीने केवळ 21 प्रकरणं सोडवली
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
27 Aug 2019 07:43 PM (IST)
मुंबईची 'लाईफलाईन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकलवर दगडफेक करणाऱ्यांमुळे मुंबईकरांची 'लाईफ' धोक्यात आली आहे.
Getty Image
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -