मुंबई : मुंबई विद्यापीठातल्या हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थिनींना आता रात्री बाहेर राहण्याची मुभा देण्यात आली आहे. मुलांप्रमाणेच मुलींनाही यापुढे हा समान नियम लागू असेल, अशी माहिती मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु संजय देशमुख यांनी दिली आहे.
मुंबई विद्यापीठाअंतर्गत 3 हॉस्टेलमध्ये साधारण 200 विद्यार्थिनी राहतात. यापूर्वी रात्री 10 वाजता हॉस्टेलमध्ये परत यायचं असल्यास लेट पास आणि रात्रभर बाहेर थांबायचं असल्यास नाईट पास घ्यावा लागत होता. नाईट पासची मुदतही रात्री 11.30 पर्यंतचीच होती.
विशेष म्हणजे केवळ दोन नाईट आऊट पास आणि पाच लेट नाईट पास घेण्याची मुभा विद्यार्थिनींना होती. दुसरीकडे विद्यार्थ्यांसाठी मात्र अशाप्रकारची कोणतीही नियमावली नव्हती. मात्र आजपासून अशी कुठलीही बंधनं विद्यार्थिनींवर नसतील.
विद्यापीठाकडून होत असलेल्या लिंगभेदाबाबतची तक्रार विद्यार्थ्यांनी महिला विकास कक्षाकडे केली होती. त्यानंतर हा नियम शिथील करण्यात आला. अर्थात अशा विद्यार्थिनींना स्वतःच्या जबाबदारीवर आपण बाहेर राहत असल्याचं पत्र साक्षांकित करुन द्यावं लागणार आहे. कॅम्पसबाहेर असताना सोबत आयकार्ड बाळगणंही अनिवार्य असेल.