मुंबई : येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या स्कूल बसच्या फीमध्ये वाढ करण्यात आली आहे. स्कूल बस मालक संघटनेनं फीमध्ये 20 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. वाहतुकीशी निगडीत खर्चांमध्ये वाढ झाल्याने हा बोजा विद्यार्थ्यांच्या पालकांवर पडणार आहे.


स्कूल बस फीवाढीमुळे महिन्याकाठी 400 रुपयांची भर पडू शकते. सध्या स्कूल बसच्या फी महिन्याला पाचशे ते दोन हजार रुपये या दरम्यान आहेत. शाळा, घर ते शाळेतील अंतर यासारख्या अनेक गोष्टींवर ही फी अवलंबून असते. बस मालक संघटनेच्या राज्यभरात 48 हजार बसेस आहेत.

वाहतुकीचा दंड, वाहन विमा आणि देखभाल खर्चात वाढ झाली आहे. नवीन नियमावलीनुसार बसमध्ये जीपीएस आणि सीसीटीव्ही बसवण्याचा खर्चही सहन करावा लागणार आहे. त्याचप्रमाणे बसचालक आणि महिला अटेंडंटच्या पगारातही वाढ होत असल्यामुळे ही वाढ केल्याचं बस मालक संघटनेचं म्हणणं आहे.

जीपीएस आणि सीसीटीव्ही यांचा खर्च अधिक असला, तरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ते महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्याबाबत कुठलीही तडजोड केली जाणार नसल्याचंही बस मालक संघटनेचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी स्पष्ट केलं.

टोलनाक्यांवर स्कूल बसेसना सूट मिळावी यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करत आहोत, मात्र सध्या कुठलीही सवलत न मिळाल्याने टोलनाके पार करुन जावं लागणाऱ्या स्कूल बसेसला 5 टक्के अतिरिक्त भार सोसावा लागणार आहे.