ठाणे : ठाण्यातील कळवा परिसरात डोंगराचा काही भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू, तर एक जण जखमी झाला आहे. कळव्यातील अटकोनेश्वरनगर येथील ज्ञानगंगा शाळेजवळील आदर्श चाळीत ही घटना घडली.
याठिकाणी डोंगराचा काही भाग जवळच्या घरांवर कोसळला. या ढिगाऱ्याखाली तिघे जण अडकले होते, त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला तर एकजण जखमी आहे. जखमी व्यक्तीवर कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मृतांमध्ये 40 वर्षीय बीरेंद्र जसवार आणि 10 वर्षीय सनी जसवार यांचा समावेश आहे. तर निलम जसवार या जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
घटनेची माहिती मिळताच ठाणे महानगरपालिकेचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान, पोलीस कर्मचारी आणि महावितरण कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्यादरम्यान ढिगाऱ्याखाली अडकलेल्या तिघांना बाहेर काढण्यात आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यापैकी दोघांना डॉक्टरांना मृत घोषित केलं.
आदर्शचाळी लगतचा डोंगराचा काही भाग धोकादायक असल्याचं निदर्शनात आलं. त्यानंतर येथील एकूण 20 कुटुंबातील 70 रहिवाशांची जवळच्या ज्ञानगंगा शाळेमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या
- Malad Wall collapse | मुंबईतील मालाडमध्ये भिंत कोसळून 20 जणांचा मृत्यू
- Pune Wall Collapse | पुण्यात कात्रज भागात भिंत कोसळून 6 मजूरांचा मृत्यू, पाच गंभीर जखमी
- Kalyan Wall Collapse | कल्याणमध्ये शाळेची भिंत कोसळून तीन जणांचा मृत्यू