वसई : वाळू माफियांची दादागिरी पुन्हा एकदा समोर आली आहे. पालघर तालुक्यातील टेंभीखोडावे रेतीबंदरावर कारवाई करत असताना, भर समुद्रात वसईच्या महसूल पथकावर तुफान दगडफेक करण्यात आली. यात एका तलाठीसह तीन ग्रामस्थ जखमी झाले आहेत.
कारवाईसाठी नारंगी गावातील ग्रामस्थांना घेऊन गेलेल्या तिघांनाही यात जबर मारहाण झाली आहे. हरेश्वर म्हात्रे, किशोर पाटील आणि विजय पाटील अशी ग्रामस्थांची नावे आहेत. मंगळवारी वसई तहसिलदार आणि पालघर तहसिलदार यांची वाळू माफियांविरोधात सयुंक्त कारवाई करण्यात येत होती. त्यावेळी कारवाईसाठी नारंगी गावातील ग्रामस्थांच्या बोटी आणि ग्रामस्थांना महसूल विभागाने सोबत नेलं.
या कारवाईसाठी दोन तहसिलदार आणि 20 तलाठ्यांसह दहा अधिकारी होते. स्थानिक पोलीस यंत्रणेचा लवाजमाही सोबत होता. मात्र कारवाईसाठी भर समुद्रात टेंभीखोडावे रेतीबंदराजवळ आल्यावर तेथील वाळू माफियांनी कारवाई रोखण्यासाठी अधिकाऱ्यांच्या बोटीवर तुफान देगडफेक केली.