मुंबई: मुंबईतल्या घोडपदेव परिसरात महिला पोलीस कॉन्स्टेबल आरती इंगळे यांच्या साडेचार वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना आज दुपारच्या दरम्यान घडली.
भायखळामधील घोडपदेव येथे म्हाडा इमारतीच्या 15व्या मजल्यावरुन पडून मुलीचा मृत्यू झाला आहे. मात्र मुलीचा मृत्यू नव्हे तर हत्या असल्याचा आरोप महिला पोलीस आरती इंगळे यांनी केला आहे. त्यांनी याप्रकरणी भायखळा पोलीस ठाण्यात हत्येची तक्रारही दाखल केली आहे.
महिला पोलीस आरती इंगळे या आपल्या साडेचारवर्षीय मुलगी मानवीसोबत घोडपदेव येथील म्हाडाच्या इमारतीत राहत होत्या. आज सकाळी मानवी शाळेच्या युनिफॉर्ममध्ये गॅलरीत खेळत होती. मात्र, काही वेळानं आरती यांना मानवी गॅलरीत दिसली नाही. त्यानंतर मानवी खाली पडल्याचं त्यांच्या लक्षात आलं. जखमी मानवीला त्यांनी जवळच्या रुग्णालयात नेलं. मात्र तिथं मानवीला मृत घोषित करण्यात आलं.
दरम्यान, आरती इंगळे राहत असलेल्या 15 व्या मजल्यावरील शेजाऱ्यांशी त्यांचे काही वादविवाद होते. त्याच्याच राग मनात धरुन आपल्या मुलीची हत्या केल्याचा आरोप आरती इंगळे यांनी केला आहे. दरम्यान, आरती इंगळे यांनी शेजाऱ्यांविरोधात कलम 302ची तक्रार नोंदवली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.