बदलापूरमध्ये नव्या दोन हजार, पाचशेच्या बनावट नोटा जप्त
एबीपी माझा वेब टीम | 19 Dec 2016 11:25 PM (IST)
बदलापूर : सगळीकडे कोऱ्या करकरीत नव्या नोटा सापडत असताना बदलापुरात मात्र 2 हजार आणि 500 च्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. अजय पुजारी असे बनावट नोटा बाळगणाऱ्या तरुणाचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. बदलापुरमधील यात्री हॉटेल जवळ रात्री साडे आठच्या सुमाराला नव्या बनावट नोटा घेऊन काही जण येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीसांना सापळा रचून संशयितरित्या उभा असलेल्या अजय पुजारीला ताब्यात घेतलं. अजय पुजारीची झडती घेतली असता चलनातील नव्याने आलेल्या दोन हजार रुपयाची एक नोट आणि पाचशे रुपयाच्या नऊ नोटा असे 6 हजार 500 रुपयांच्या बनावट नोटा त्याच्याकडे मिळाल्या. पोलिसांनी या नोटा जप्त केल्या आहेत. दरम्यान अजय पुजारीने या बनावट नोटा कुठून आणल्या, तसेच या प्रकरणात आणखी कुणी सहभागी आहे का, याचा तपास पोलिस करत आहेत.