कल्याणमध्ये मद्यधुंद महिलेचा भर रस्त्यात धिंगाणा
एबीपी माझा वेब टीम | 19 Dec 2016 08:51 PM (IST)
कल्याण: रविवारी संध्याकाळी कल्याणच्या पत्रीपुलावर एका मद्यधुंद महिलेचा धिंगाणा पाहायला मिळाला. मेट्रो मॉल परिसरात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका बसला या महिलेच्या गाडीनं धडक दिली. त्यानंतर खाली उतरुन तिनं धिंगाणा घालायला सुरुवात केली. या महिलेनं इतकं मद्यपान केलं होतं की, तिला धड उभं राहता येत नव्हतं. दारुच्या नशेतच ती बडबड करत होती. यावेळी मोबाईलवर शूटिंग करणाऱ्यांच्या अंगावरही ती धावून गेली. पोलिसांनी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही ती जुमानत नव्हती. ऐन गर्दीच्या वेळी झालेल्या या तमाशानं पत्रीपुलावर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. अखेर कोळसेवाडी पोलिस ठाण्यातील महिला पोलीस आल्यानंतर या महिलेची पोलीस ठाण्यात रवानगी झाली. तिच्यावर अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मूळची ठाण्याची असलेली ही महिला एका खासगी कंपनीत उच्चपदावर काम करत असल्याची माहिती मिळते आहे.