मुंबई : कारखाली येऊनही आश्चर्यकारकरित्या बचावलेल्या मुलाचा शोध लागला आहे. निष्काळजीपणे गाडी चालवणाऱ्या महिलेची माहितीही 'एबीपी माझा'च्या हाती लागली आहे. मुंबईतील दिंडोशी भागात राहणाऱ्या श्रद्धा चंद्राकर यांचा निष्काळजीपणा चिमुरड्याच्या जीवावर बेतला असता.


श्रद्धा चंद्राकर आणि गाडीखाली आलेला मुलगा गोरेगावमधील दिंडोशी भागातल्या सद्गुरु कॉम्प्लेक्समध्ये राहतात. गाडी बाहेर काढताना चंद्राकर यांनी केलेल्या हलगर्जीमुळे चिमुरडा गाडीखाली आला होता. 24 तारखेला संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

पोलिसांनी पालकांना विचारणा केल्यानंतर आता श्रद्धा चंद्राकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोटर वाहन कायद्यातील कलम 337 आणि 134 नुसार बेदरकारपणे गाडी चालवणे आणि पोलिसांपासून अपघाताची माहिती लपवून ठेवणे या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा अजामीनपात्र असल्याने आरोपीला कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

काय आहे प्रकरण ?

24 सप्टेंबरला संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास आरोपी श्रद्धा चंद्राकर आपली कार इमारतीच्या पार्किंगमधून काढत होत्या. याच ठिकाणी काही मुलं फुटबॉल खेळत होती. यातील एका मुलाच्या बुटाची लेस सुटली आणि तो कारच्या बाजूला लेस बांधण्यासाठी बसला. त्याचवेळी श्रद्धा यांनी गाडी सुरु केली आणि अक्षरशः ती कार मुलाच्या अंगावरुन नेत त्या निघून गेल्या.

क्षणभर हा मुलगा गाडीखाली चिरडला गेला असावा, असं सीसीटीव्ही पाहताना वाटतं, मात्र गाडी निघून गेल्यावर हा मुलगा सुरक्षितपणे उठून उभा राहिला आणि धावत पुन्हा खेळायला गेला. हा सर्व थरार सीसीटीव्हीत कैद झाला. सीसीटीव्ही व्हिडिओ पाहिल्यानंतर या ठिकाणी ही गंभीर घटना घडल्याचं सर्वांच्या निदर्शनास आलं.

लहान मुलं खेळत असताना पालकांनी आणि वाहनचालकांनी दक्षता बाळगण्याची गरज अधोरेखित होत आहे.