मुंबई : पश्चिम रेल्वेवर लेडीज स्पेशल लोकल चालवण्याचा निर्णय होऊन ती लोकल धावायला देखील लागली. त्यानंतर मध्य रेल्वेला लेडीज स्पेशल सुरू करण्याची जाग आली आहे. त्यामुळेच मध्य रेल्वेवर देखील आता सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन लेडीज स्पेशल लोकल चालवल्या जाणार आहेत. यासोबतच ट्रान्स हार्बर मार्गावर देखील चार लोकलच्या फेऱ्या आणि सीएसएमटी ते कल्याण मार्गावर दोन अतिरिक्त लोकलच्या फेऱ्या चालवण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. या सर्व अतिरिक्त लोकल एक ऑक्टोबरपासून सेवेत दाखल होतील.


मुंबईत मध्य रेल्वेवर सर्वात जास्त प्रवाशांची संख्या आहे. सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी या लोकल चालवण्यात येत आहेत. मात्र त्यातही मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी होताना दिसते आहे. त्यात महिला डब्यांची संख्या मर्यादित असल्यामुळे महिलांच्या डब्यात होणारी गर्दी कमी करण्यासाठी आणि महिलांच्या सुरक्षेसाठी लेडीज स्पेशल लोकल चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.


अतिरिक्त लोकलचे वेळापत्रक अशा प्रकारे असेल…


महिला विशेष लोकल कल्याण येथून सकाळी 8.25 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे 9.34 वाजता पोहोचेल. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून हीच महिला विशेष लोकल 6.35 वाजता सुटेल आणि कल्याण येथे 7.44 वाजता पोहोचेल.


ऑक्टोबरमध्ये सर्वांसाठी लोकल सुरु करण्याचा विचार : आदित्य ठाकरे


यासोबत 2 लोकल फेऱ्या अतिरिक्त सोडण्यात येणार आहेत. त्यातील एक विशेष लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 9.45 वाजता सुटेल आणि कल्याण येथे 10.50 वाजता पोहोचेल. तसेच दुसरी विशेष लोकल संध्याकाळी 4.10 वाजता कल्याण येथून सुटेल आणि 5.16 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल. या विशेष सेवा फक्त भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, ठाणे, दिवा आणि डोंबिवली येथे थांबतील.


मध्य रेल्वेवरील या अतिरिक्त लोकल प्रमाणेच गेल्या अनेक दिवसांपासून ट्रान्स हार्बर मार्गावर देखील लोकलच्या फेऱ्या वाढवण्यासाठी मागणी होत होती. त्यानुसार 4 फेऱ्या अतिरिक्त चालवण्यात येणार आहेत. त्याचे वेळापत्रक असे असेल,




  • त्यातील एक पनवेल विशेष लोकल ठाणे येथून सकाळी 9 वाजता सुटेल आणि पनवेल येथे 9.50 वाजता पोहोचेल.

  • तर दुसरी पनवेल विशेष ठाणे येथून संध्याकाळी 6.30 वाजता सुटेल आणि पनवेल येथे 7.24 वाजता पोहोचेल.

  • तसेच ठाणे विशेष लोकल पनवेल येथून सकाळी 7.55 वाजता सुटेल आणि ठाणे येथे 8.50 वाजता पोहोचेल.

  • तर दुसरी ठाणे विशेष पनवेल येथून संध्याकाळी 5.20 वाजता सुटेल आणि ठाणे येथे 6.15 वाजता पोहोचेल.

  • या विशेष जलद लोकल असणार आहेत आणि फक्त रबाळे, कोपरखैरणे, तुर्भे, जुईनगर, नेरूळ आणि बेलापूर येथे थांबतील.