मुंबई : 15 ऑक्टोबरनंतर काही प्रमाणात लोकल प्रवास सर्वसामान्यांसाठी सुरु करण्याचा सरकारचा विचार सुरु आहे, असं मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी एका मुलाखतीत सांगितलं. प्रवासी संघटना, सर्वसामान्य जनता यांच्याकडून लोकल लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी वाढत आहे. त्यासाठी कार्यालयांच्या वेळा बदलता येतील का?, यासंदर्भात चर्चा सुरु असल्याचंही आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.


दरम्यान महाविकास आघाडीतील कोणत्याही मंत्र्याने याबाबत अधिकृतरित्या माहिती दिलेली नाही.


सध्या केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवासाची परवानगी आहे. परंतु इतर प्रवाशांना बस, खासगी वाहनांमधून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे त्यांचे बरेच तास प्रवासात जात आहेत. त्यामुळे हे हाल टाळण्यासाठी सर्वसामान्यांसाठी लोकल कधी सुरु होणार, असं प्रश्न वारंवार विचारण्यात येत आहे. याविषीय आदित्य ठाकरे यांनी या मुलाखतीत भाष्य करत काही महत्त्वाचे संकेत दिले.


इतरांसाठीही मुंबई लोकल प्रवास सुरु करण्याबाबत विचार करा, हायकोर्टाची राज्य सरकारला सूचना


ते म्हणाले की, "ऑक्टोबरच्या मध्यात लोकल सुरु करण्याचा सरकारचा विचार सुरु आहे. प्रवासाच्या आणखी काही सुविधा सुरु करण्यावरही आमचा भर आहे. आम्ही अनेक गोष्टी वेळ घेऊन विचारपूर्वक सुरु करत आहोत. कारण एकदा सुरु केलेल्या गोष्टी आम्हाला पुन्हा बंद करायच्या नाहीत."


तसंच "सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचीही संख्या जास्त असल्याने आता लोकलची संख्या वाढवणं गरजेचं आहे. याबाबत रेल्वे प्रशासनाशी संवाद सुरु आहे. लोकलची संख्या वाढवल्यावर अधिक जणांना प्रवासाची परवानगी दिली जाईल. अन्यथा प्रवासाच्या इतर साधनांवरील ताण वाढेल," असं आदित्य ठाकरे म्हणाले.


कार्यालयीन वेळेत बदल करण्याचा विचार
आदित्य ठाकरे म्हणाले की, "मुंबईतील कोरोनाची स्थिती आणि लोकसंख्येचा विचार कार्यालयीन वेळांमध्ये बदल करण्याचा विचार आहे. मुंबईत विविध प्रकारची कार्यालयं आहेत. त्यांच्या वेळा बदलण्याचं काम अवघड आहे. सध्या आम्ही विविध कार्यालयं, संकुलं आणि कार्पोरेट्सशी कामाच्या वेळांमध्ये बदल करण्याविषयी चर्चा करत आहोत. कार्यालयीन कामासाठी संपूर्ण 24 तासांचा वापर करता येईल का याची चाचपणी सुरु आहे, जेणेकरुन लोकल सेवेवर ताण येणार नाही. असं झाल्यास ऑक्टोबरपर्यंत सगळ्यांसाठी लोकल सेवा सुरु होऊ शकते."


Aaditya Thackeray | ऑक्टोबरमध्ये सर्वांसाठी लोकल सुरु करण्याचा विचार : आदित्य ठाकरे