मुंबई : मुंबईतील कुर्ल्यामध्ये बेपत्ता मुलीचा शोध लावण्यात अपयशी ठरलेल्या पोलिसांना संतप्त नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागलाय. पूर्व द्रूतगती मार्गावर स्थानिकांनी पोलिसांवर दगडफेक केली. या दगडफेकीत पोलिसांच्या वाहनांचं मोठं नुकसान झालंय. मुंबईचे रहिवासी पंचाराम रिठाडिया यांची मुलगी बेपत्ता आहे. मुलीचा शोध लागत नसल्यानं रिठाडिया यांनी रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या केली. आज पंचाराम रिठाडिया यांच्या अंतयात्रेदरम्यान स्थानिकांनी पोलिसांना लक्ष्य केलं आणि त्यांच्यावर दगडफेक केली. त्यामुळं पूर्व द्रूतगती मार्गावरची वाहतूक बऱ्याच काळासाठी विस्कळीत झाली होती.
दरम्यान अजूनही मुलीचा शोध लागलेला नसल्याने नागरिकांच्या भावनांचा उद्रेक झाला आहे. कुर्ला येथील ठक्कर बाप्पा कॉलोनीत राहणाऱ्या पंचाराम रिठाडिया यांची मुलगी बऱ्याच दिवसांपासून बेपत्ता असल्याने त्यांनी 13 ऑक्टोबर रोजी आत्महत्या केली होती. आज त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले. दरम्यान अंत्ययात्रा सुरु झाल्यानंतर नागरिकांचा संताप अनावर झाला. यावेळी अंत्ययात्रेत सहभागी नागरिक आणि युवकांनी दगडफेक सुरु केली. संतापलेल्या नागरिकांनी यावेळी पोलिसांना टार्गेट केले. यावेळी पोलिसांना मारहाण देखील करण्यात आली.
यावेळी पोलिसांच्या गाड्या देखील फोडण्यात आल्या. या घटनेत दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. नागरिकांनी यावेळी रास्ता रोको देखील केला. यानंतर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कुर्ल्यासह, चेंबूर, टिळकनगर आणि आजूबाजूच्या पोलीस स्थानकांमधून फौजफाटा मागवण्यात आला आहे. सध्या या ठिकाणी तणावपूर्ण शांतता आहे. या घटनेमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर बराच काळ वाहतूक कोंडी झाली होती.
बेपत्ता मुलीचा शोध न लागल्याने वडिलांची आत्महत्या, अंत्ययात्रेदरम्यान स्थानिकांची दगडफेक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Oct 2019 06:21 PM (IST)
मुंबईतील कुर्ल्यामध्ये बेपत्ता मुलीचा शोध न लागल्याने पित्याने आत्महत्या केल्यानंतर वातावरण तापले आहे. मुलीचा शोध लावण्यात अपयशी ठरलेल्या पोलिसांना संतप्त नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागलाय. पूर्व द्रूतगती मार्गावर स्थानिकांनी पोलिसांवर दगडफेक केली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -