मुंबई: भरधाव बेस्ट बसमुळे मुंबईच्या कुर्ला परिसरात सोमवारी रात्री भीषण अपघात घडला होता. या अपघातामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला होता. या अपघातासाठी कारणीभूत ठरलेला बेस्टचालक संजय मोरे (Sanjay More) हा सध्या सगळ्यांच्या रडारवर आहे. संजय मोरे याला अलीकडेच बेस्टच्या ताफ्यातील इलेक्ट्रिक बस चालवण्यासाठी देण्यात आली होती. मात्र, त्याला बसवर नियंत्रण राखता आले नाही आणि हा अपघात घडला. या अपघातानंतर (Kurla Bus Accident) रस्त्यावरील मृतदेह आणि जखमी लोक पाहून स्थानक जमाव संतप्त झाला होता. या संतप्त जमावाने चालक संजय मोरे याची हत्या केली असती. मात्र, एक वकील आणि पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे संजय मोरे याचा जीव थोडक्यात बचावला. तर बस नंबर 332 चा कंडक्टर हा येथील एका दाताच्या दवाखान्यात लपून बसल्यामुळे त्याचा जीव वाचल्याची माहिती समोर आली आहे.
बेस्टची बस नंबर 332 कुर्ला येथील एलबीएस मार्गावरुन जात असताना हा अपघात घडला. या बसने गाड्यांना आणि पादचाऱ्यांना उडवल्यानंतर ही बस एका सोसायटीच्या भिंतीवर जाऊन आदळली. यावेळी रस्त्यावर छिन्नविछिन्न पडलेले मृतदेह पाहून रस्त्यावर उतरलेला दोन ते तीन हजारांचा संतप्त जमाव आक्रमक झाला. संतप्त जमावाने चालक संजय मोरेला बसच्या बाहेर काढले आणि मारहाण करायला सुरुवात केली. यावेळी बसचा कंडक्टर सिद्धार्थ मोरेही जमावाच्या तावडीत सापडला. या दोघांना जमावाकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरु होती. त्यावेळी ॲडव्होकेट आसिफ हुसेन हे संजय मोरेला वाचवण्यासाठी पुढे सरसावले. त्यांनी मागचापुढचा कोणताही विचार न करता संजय मोरे याच्या अंगावर झेप घेत त्याला जमावापासून बाजूला नेत कसेबसे पोलीस व्हॅनपर्यंत पोहोचवले. यादरम्यान, बसचा कंडक्टर सिद्धार्थ मोरे जमावाच्या तावडीतून निसटून एका दाताच्या दवाखान्यात जाऊन लपून बसला होता. ॲडव्होकेट आसिफ हुसेन यांनी त्याला तिकडे जाऊन वेगळे कपडे दिले. हे कपडे घालून सिद्धार्थ मोरेला बाहेर काढण्यात आले.
अपघानानंतर संजय मोरे रडायला लागला
या अपघानंतर आसिफ हुसेन यांनी संजय मोरे याला वाचवले तेव्हा तो खूप घाबरला होता. तो प्रचंड अस्वस्थ होता. संजय मोरे हा आसिफ हुसेन यांना मिठी मारुन रडायला लागला. त्याला काहीच सुचत नव्हते, असे आसिफ हुसेन यांनी सांगितले. तर पोलीस उपनिरीक्षक प्रशांत चव्हाण यांनीही धाडस दाखवत संजय मोरे आणि सिद्धार्थ मोरे या दोघांना जमावाच्या तावडीतून सोडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पोलीस उपनिरीक्षक प्रशांत चव्हाण हे येथील भाजी मार्केटमध्ये गस्त घालत होते. तेव्हा बसने फरफट आणलेली एक रिक्षा चव्हाण यांच्या दिशेने आली, त्यामुळे चव्हाण हे हातगाडी आणि रिक्षाच्या मधोमध अडकून पडले होते. मात्र, जखमी अवस्थेतही त्यांनी कुर्ला पोलीस ठाण्यात फोन करुन अतिरिक्त कुमक मागवून घेतली. त्यानंतर प्रशांत चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संजय मोरे आणि सिद्धार्थ मोरे या दोघांना जमावाच्या तावडीतून वाचवले.
आणखी वाचा