मुंबई : कोपर्डी (Kopardi) सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी जितेंद्र उर्फ पप्पू शिंदेच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी करत त्याच्या आईनं हायकोर्टात (Mumbai High Court) याचिका दाखल केली आहे. याची दखल घेत न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे व न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठानं येरवडा कारागृह प्रशासना राज्य सरकारला उत्तर देण्याचे निर्देश जारी केले आहेत.

  


काय आहे याचिका?


आरोपी जितेंद्र उर्फ पप्पू शिंदेची आई लता बाबूलाल शिंदे यांनी ही याचिका दाखल केली आहे. पप्पूनं याप्रकरणी येरवडा कारागृहात असताना 10 सप्टेंबर 2023 रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. कारागृहात पप्पूच्या झालेल्या अनैसर्गिक मृत्यूची आता न्यायालयीन चौकशी करावी. कारागृहात पप्पूला देण्यात येणाऱ्या औषधांचा तपशील कोर्टानं मागवून घ्यावा, अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. येरवडा कारागृहासह येरवडा पोलीस ठाणे, गृह विभाग व अतिरिक्त पोलीस महासंचालक (कारागृह) यांना याचिकेत प्रतिवादी करण्यात आलेलं आहे. 


काय आहे प्रकरण? 


कोपर्डी सामूहिक बलात्कार प्रकरणी 18 नोव्हेंबर 2017 रोजी अहमदनगर विशेष न्यायालयानं पप्पू शिंदेसह अन्य आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावली आहे. या शिक्षेवर शिक्कामोर्तब करण्यासाठी राज्य सरकारतर्फे मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झालेली आहे. ही याचिका प्रलंबित असतानाच पप्पूनं एके दिवशी कारागृहात आत्महत्या केली. पप्पू हा मानसिक आजारानं त्रस्त होता. वकिलांना याबाबत वेळोवेळी पत्रही लिहिण्यात आलं होतं. त्यामुळे कारागृह प्रशासनाला याची पूर्ण माहिती होती. दोन वर्षे त्याला हा त्रास होत होता. या दरम्यान कारागृहातील डॉक्टरांकडून त्याला काही औषधं सुरु होती, असंही याचिकेत नमूद करण्यात आलेलं आहे.


आरोपीची कारागृहात आत्महत्या


कोपर्डीतील हत्या प्रकरणातील आरोपी जितेंद्र शिंदे येरवडा कारागृहात होता. कारागृहातील सुरक्षा क्रमांक 1 मधील खोली क्रमांक 14 मध्ये पप्पूने टॉवेल फाडून कापडी पट्टीच्या साहाय्याने खोलीच्या दरवाजावरील पट्टीला बांधून सकाळी सहाच्या सुमारास आत्महत्या केली.  ही बाब कामावर असणाऱ्या करागृह कर्मचारी निलेश कांबळे यांच्या लक्षात आली त्यांनी तातडीने उतर सहकाऱ्यांना बोलावून घेत पप्पूला खाली उतरवले परंतु तोपर्यंत त्याचा जीव गेला होता. पप्पूवर मानसिक आजारावर कारागृह मनोरुग्ण तज्ज्ञ यांच्या सल्ल्याने नियमीत औषधपचार सुरू होते. 


ही बातमी वाचा : 


Washim News : मासळी पकडण्यासाठी गेलेल्या दोघांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींच्या जाण्याने हळहळ