मुंबई : राज्यातील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील अनेक राजकीय दहीहंड्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाजप नेते राम कदम यांच्या घाटकोपरमधील दहीहंडीपाठोपाठ सचिन अहिर यांच्या संकल्प प्रतिष्ठानची वरळीतील आणि प्रकाश सुर्वे यांच्या पुढाकाराने होणारी दहीहंडी रद्द करण्यात आली आहे. ही रक्कम पूरग्रस्तांच्या मदतनिधीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईत दरवर्षी साधारणत: तीन हजार लहान-मोठ्या दहीहंड्यांचं आयोजन केलं जातं. त्यातील प्रमुख हंड्यांचा खर्च काही कोटींच्या घरात असतो. यापैकी मोठ्या मंडळांच्या दहीहंड्या यंदा रद्द करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे. तसंच गिरगाव, दादर, कुर्ला या भागांमधील राजकीय हंड्याही यंदा होणार नाहीत.

यंदा या दहीहंड्या रद्द?
- राम कदम यांची घाटकोपरमधील दहीहंडी
- आमदार प्रकाश सुर्वे यांची दहीहंडी
- सचिन अहिर यांची वरळीतील दहीहंडी

ठाण्यात खर्चाला फाटा देत पारंपरिक पद्धतीने दहीहंडी
तर ठाण्यात यंदा दहीहंडी उत्सव धुमधडाक्यात साजरा न करता पारंपरिक पद्धतीने होणार असल्याचं आयोजकांनी सांगितलं. दहीहंडीच्या बक्षीसाची रक्कम आणि कलाकारांच्या मानधनाच्या खर्चाला कात्री लावून हा निधी पूरग्रस्तांना देणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. ठाण्यातील टेंभी नाका, वर्तनकनगरमधील संस्कृती प्रतिष्ठान, रघुनाथ नगरमधील संकल्प प्रतिष्ठान, हिरानंदानी मेडोजमधील समर्थ प्रतिष्ठान आणि मनसेच्या नौपाड्यातील दहीहंडी यंदा पारंपरिक पद्धतीने साजरी होईल.