माफियांशी समझोत्याची चर्चा शक्य नाही, सोमय्यांचा घणाघात
एबीपी माझा वेब टीम | 19 Jan 2017 03:17 PM (IST)
मुंबई : माफियांशी समझौत्याची चर्चा होऊ शकत नाही. महापालिकेत माफियाबंदी स्वीकारावी लागणार आहे, असा घणाघात भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. महापालिका निवडणुकांच्या तोंडावर युतीबाबत कोणताही ठोस निर्णय झाला नसताना शिवसेना-भाजपमध्ये तू-तू-मै-मै सुरुच आहे. 'माफियांशी समझौत्याची चर्चा होऊ शकत नाही. महापालिकेत माफियाबंदी स्वीकारावी लागणार आहे. राहता राहिला प्रश्न जाहीरनाम्याचा, तर शिवसेनेने आतापर्यंत काय केलं? महापालिकेतील गेल्या 22 वर्षांचा हिशोब द्यावा', अशी मागणी सोमय्यांनी केली. शिवसेना आणि सेना नेत्यांची नोटाबंदीमुळे नाकाबंदी झाली आहे, त्यामुळे त्यांची अडचण समजू शकतो, अशी टीकाही किरीट सोमय्या यांनी केली. भाजप हा मुंबईच नव्हे, तर महाराष्ट्र, देशात एक नंबरचा पक्ष आहे. कोणी मित्रपक्ष आमच्याबरोबर येत असेल तर त्यांना किती जागा द्यायच्या हा एक मुद्दा आहे. मात्र आम्ही कुणाकडे भीक मागत नाही तो काळ आता गेला, असा टोलाही किरीट सोमय्यांनी लगावली.