मुंबई: "देवेंद्र, बेटा तू विदर्भाचा आहेस. गरिबाच्या घरच्या लेकिंना रस्त्यावर कुंकू पुसण्याची वेळ येऊ नये. त्यासाठी तू सर्वात आधी रस्त्याचं काम हाती घे", अशी आग्रही मागणी ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांनी केली. त्या एबीपी माझाशी बोलत होत्या.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर प्रवास करताना सिंधुताई सपकाळ यांच्या डोळ्यादेखतच भीषण अपघात होता होता टळला. एक्स्प्रेस वेवरील असुविधा आणि ढिसाळ नियोजनावरुन, सिंधुताईंनी आयआरबीच्या अधिकाऱ्यांना, टोलवरुनच फोन करुन झापलं.

सिंधुताई सपकाळ यांनी तळेगावजवळच्या उर्से टोलनाक्यावरच्या आयआरबी कर्मचारी आणि व्यवस्थापकांना खडे बोल सुनावले. पैसे घेऊनही मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील वाहतूक असुरक्षित आहे, आणखी किती जीव घेणार, असा जाब विचारताना सिंधुताईंचा उद्रेक झाला.

त्याबाबत सिंधुताईंनी आपली व्यथा एबीपी माझाकडे मांडली.

"एक्स्प्रेस वे हा संकटाचा मार्ग झाला आहे.


 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आजपर्यंत याची बातमी पोहोचली नसेल.


पण त्यांनी आता यामध्ये लक्ष घालावं"


असं सिंधुताई म्हणाल्या.


मी विदर्भातील आहे. मुख्यमंत्रीही विदर्भाचा लेक आहे. देवेंद्र तुला विनंती आहे बेटा, राज्यातील अनेक माय-लेकांचे संसार वाचवं.महाराष्ट्राला अश्रू ढाळू देऊ नकोस. रस्ते दुरुस्त कर. विदर्भाचा आहेसं म्हणू हक्काने सांगतेय, अशी विनंती सिंधुताईंनी केली.

याशिवाय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही रस्त्याच्या कामाची सुरुवात करावी आणि गरिबांचं कुंकू वाचवावं, अशी मागणीही सिंधुताईंनी केली.



संबंधित बातम्या
आणखी किती जीव घेणार? तळेगाव टोलनाक्यावर सिंधुताईंचा उद्रेक