Kirit Somaiya On Jarandeshwar Sugar Mill Issue : जरंडेश्वर साखर कारखानाप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. जरंडेश्वर साखर कारखाना 27 हजार शेतकऱ्यांना हस्तांतरीत करा या मागणीसाठी सोमय्या यांनी आज ईडीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी काही शेतकरी सभासद देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते. अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर किरीट सोमय्या म्हणाले की, हा कारखाना शेतकऱ्यांच्या ताब्यात द्यावा. अन्यायकारक पद्धतीनं कारखाना ताब्यात घेतला असल्याचं यावेळी शेतकरी सभासद म्हणाले. 


किरीट सोमय्या यांनी म्हटलं की, अजित पवारांना कोर्टानं उत्तर दिलेलं आहे. अजित पवारांनी हा कारखाना शेतकऱ्यांना देण्यासाठी प्रयत्न करावा असंही ते म्हणाले. सोमय्यांनी ट्विट करत अजित पवार यांनी बेनामी पद्धतीनं आणि अत्यंत कमी किंमतीत ‘गुरु कमोडीटीज’च्या वतीने हा कारखाना घेतल्याचा दावा केला होता. या विक्री व्यवहारातून कारखान्याच्या सभासदांची मोठी फसवणूक झाल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला होता.


आज काय म्हणाले किरीट सोमय्या


आम्ही जरंडेश्वर कारखान्याच्या संदर्भात ईडीला निवेदन दिलं आहे. हा कारखाना 27 हजार शेतकऱ्यांच्या ताब्यात द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांसह आम्ही केली आहे. जर अजित पवारांचा संबंध या कारखान्याशी नसेल तर त्यांनी तो कारखाना शेतकऱ्यांच्या ताब्यात देत आदर्श उदाहरण ठेवावं, असं सोमय्या म्हणाले.


काय म्हणाले होते अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जरंडेश्वर साखर कारखान्यावरून म्हटलं होतं की, महाराष्ट्रातील साखर कारखानादारीबद्दल अनेक बातम्या आल्या. मी अनेकदा उत्तर देणं टाळलं. एसीबी, पोलिस आणि सहकार विभाग अशा वेगवेगळ्या यंत्रणांनी चौकशी केली, मात्र त्यात काहीही निष्पन्न झालं नाही. साखर कारखान्यासंदर्भात खोटी आकडेवारी देऊन आरोप केले जात आहेत. 25 हजार कोटींचा भ्रष्टाचार हा खोटा आरोप आहे, असंही अजित पवार म्हणाले.  


जरंडेश्वर कारखाना प्रकरण काय आहे 


कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर साखर काही वर्षांपूर्वी लिलावातून विक्री झाली.
सध्या हा कारखाना अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या खासगी मालकीचा असून सध्या तो ‘जरंडेश्वर शुगर्स’ नावाने चालविला जात आहे.
लिलावाच्या वेळी मूल्यांकनापेक्षा कमी रकमेत कारखान्याची विक्री झाल्याचा आरोप शालिनीताई पाटील यांनी केला होता.
या प्रकरणी न्यायालयात गेल्यावर न्यायालयाच्या आदेशानुसार जरंडेश्वर कारखान्याच्या खरेदी विक्री व्यवहाराची ‘ईडी’ मार्फत चौकशी सुरू आहे.
ईडीने सध्या हा कारखाना जप्त केला असून आयकर खात्याकडून या कारखान्याची चौकशी सुरू आहे.



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha