Pune MNS News Update :  पुणे मनसेतील (Pune MNS) नाराजी नाट्यानंतर पक्षाध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पुण्यातील प्रमुख नेत्यांना आज मुंबईत बोलावलं आहे. यामध्ये मनसेचे पश्चिम महाराष्ट्राचे नेते बाबू वागसकर, अनिल शिदोरे आणि नगरसेवक साईनाथ बाबर यांचा समावेश आहे.  परंतु राज ठाकरेंच्या वक्तव्यामुळे आपली अडचण झाल्याच जाहीरपणे सांगणाऱ्या शहराध्यक्ष आणि नगरसेवक वसंत मोरे यांना मात्र मुंबईला बोलावण्यात आलेले नाही.  त्यामुळे वसंत मोरे आता काय भूमिका घेणार? याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे.


काय म्हणाले होते वसंत मोरे?


मनसे शहराध्यक्ष आणि नगरसेवक वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर म्हटलं होतं की,  माझ्या प्रभागात शांतता हवी असल्याने हनुमान चालीसा लावणार नाही. सोबतच राज ठाकरेंच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेतल्याचेही त्यांनी म्हटले. आमच्या काही उत्साही कार्यकर्त्यांनी हनुमान चालीसा लावली. परंतु, सध्या रमजान सुरु असल्याने मला माझ्या प्रभागात शांतता हवी आहे. म्हणून मी हनुमान चालीसा वगैरे काही लावणार नाही. याचा अर्थ मी राज ठाकरे किंवा पक्षावर नाराज आहे, असा मुळीच नाही, असेही वसंत मोरे यांनी स्पष्ट केलं होतं.


काय म्हणाले होते राज ठाकरे?


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्कवरील सभेत कार्यकर्त्यांना संबोधित करताना मशिदीवरील भोंग्याविषयी वक्तव्य केले होते. त्यानंतर मनसेतील कार्यकर्त्ये आणि पदाधिकारी यांच्यामध्ये नाराजी असल्याचे दिसून आले आहे. मशिदीवरील भोंगे उतरवले नाही तर त्यासमोर डबल आवाजात हनुमान चालिसा लावण्याचे राज ठाकरे यांनी सांगितले होते. त्यानंतर मुंबई, पुण्यासह अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्ते नाराज झाल्याचं दिसून आलं. काही कार्यकर्त्यांनी राजीनामे देखील दिले होते. 



महत्त्वाच्या बातम्या: