मुंबई : भाजपने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी दिलेली मोठी जबाबदारी माजी खासदार किरीट सोमय्या यांनी नाकारली आहे. निवडणुकीसाठी कॅम्पेन कमिटीचा सदस्य म्हणून किरीट सोमय्यांची नियुक्ती भाजपकडून करण्यात आली होती. पण आपण 2019 पासून पक्षाचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, त्यामुळे विनम्रपूर्वक ही जबाबदारी नाकारतो असं पत्र किरीट सोमय्या यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना लिहिलंय.
लोकसभा निवडणुकीत बसलेल्या धक्क्यानंतर आता भाजपने सावध खेळी करत विधानसभेसाठी प्लॅन केला आहे. महायुतीच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणून सत्ता राखायची असं धोरण भाजपचं आहे. त्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळे नियोजन करण्यात येतंय. तसेच महत्त्वाच्या नेत्यांकडे महत्त्वाच्या जबाबदाऱ्याही देण्यात येत आहेत. माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याकडेही निवडणूक मोहिम समितीचे सदस्यपद देण्यात आलं होतं. पण सोमय्या यांनी त्याला स्पष्ट नकार दिला.
आपण 2019 पासून पक्षाचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम करतोय, त्यामुळे निवडणूक समितीच्या सदस्यत्वाची जबाबदारी आपण घेऊ शकत नाही असं किरीट सोमय्या यांनी म्हटलंय.
काय म्हणाले किरीट सोमय्या?
मला प्रचार समितीचा सदस्य म्हणून नियुक्त केल्याबद्दल आभार मानतो आणि या समितीत काम करण्यास असमर्थता व्यक्त करतो. गेली साडे पाच वर्षे, म्हणजे 18 फेब्रुवारी 2019 पासून मी भाजपचा सामान्य सदस्य म्हणून काम करत आहे, मला सामान्य सदस्य म्हणून काम करू द्यावे.
सामान्य सदस्य म्हणून ठाकरे सरकारचे घोटाळे काढले. त्यावेळी तीन वेळा माझा वर जीवघेणे हल्ले ही झाले.
मी आपल्या ह्या निवडणूक व्यवस्थापन आणि प्रचार समितीमध्ये सामील होऊ शकत नाही. सामान्य सदस्य म्हणून आयुष्यभर पक्षाचे काम करणार
भाजपचे नेते किरीट सोमय्या हे 2014 साली ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले होते. 2019 साली शिवसेनेच्या विरोधामुळे भाजपने त्यांचे तिकीट नाकारले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे महाविकास आघाडीमध्ये गेल्यानंतर किरीट सोमय्या पुन्हा सक्रिय झाले आणि त्यांनी सरकारमधील अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप केला. त्यामध्ये संजय राऊत यांच्यापासून हसन मुश्रीफ, अनिल परब, अनिल देशमुखांच्या नावाचा समावेश आहे. अशा परिस्थितीत 2024 सालच्या लोकसभा निवडणुकीत त्यांना तिकीट मिळेल अशी अपेक्षा होती. पण पक्षाने मिहीर कोटेच्या यांना तिकीट दिल्यामुळे सोमय्या नाराज असल्याची चर्चा होती.
ही बातमी वाचा: