मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी मुंबई माफिया मुक्त करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. सत्ताधारी शिवसेनेने मुंबईच्या कारभाराचा हिशोब द्यावा, असे आव्हानही सोमय्यांनी दिले आहे.

मुंबई महापालिकेच्या कारभारात रस्ते, डंपिंग, कचरा, नालेसफाई आणि एफएसआय घोटाळा अशा अनेक घोटाळ्यांचा प्रथम हिशोब द्यावा, तसेच मुलुंड, देवनार डंपिंग ग्राऊंड बंद करणारच असा निर्धारही सोमय्यांनी व्यक्त केला.

“मुंबई उच्च न्यायलय, सर्वोच्च न्यायालय आणि प्रदुषण महामंडळाने स्पष्टपणे डंपिंग ग्राऊंडवरील कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे आदेश दिल्यानंतरही डंपिंग माफियांच्या मर्जीने डंपिंग सुरूच ठेवण्यात आले आहे. दुसरीकडे, जर हिंमत असेल तर शिवसेनेने 30 लाख मुंबईच्या जनतेसमोर जाऊन आम्ही डंपिंग सुरूच ठेवणार असल्याचे सांगा आणि न्यायालयातही जाऊन न्यायालयाचे आणि बिल्डरांचे साटेलोटे असल्याचे सांगा”, असे आव्हान शिवसेनेला दिले.

दरम्यान, मुंबईतील माफियांना संपवण्यासाठी जर कुणी मला गुंड म्हटले तरी माझी हरकत नसल्याचेही सोमय्या यांनी स्पष्ट केले.